बेळगाव : बेळगाव शहरात 3 ठिकाणी भाजी मार्केट व बाजार भरविण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी तिन्ही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तेथे बाजार निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. सीपीएड मैदान, ऑटोनगर येथील आरटीओ मैदान व कंग्राळी खुर्द मुख्य रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक 62 मधील 2 एकर खुल्या जागेत भाजी मार्केट व बाजार भरणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
या तिन्ही ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने तीन पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक पथकात 7 सदस्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकाकडे एका भाजी मार्केटची जबाबदारी असेल. त्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी या पथकाला घ्यावी लागणार आहे. या तिन्ही भाजी मार्केटसाठी समन्वय अधिकारी म्हणून महापालिकेचे कार्यकारी अभियंते ई. गंगाधर यांची नियुक्ती केली आहे. शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे सोमवारपासून या तिन्ही ठिकाणचे बाजार सुरू होणार आहेत.
क्लब रोडवरील सीपीएड मैदानावरील बाजाराची जबाबदारी महापालिकेचे फलोत्पादन विभागाचे साहय्यक कार्यकारी अभियंता बाहुबली चौगला यांच्याकडे असून मदतीसाठी 6 कर्मचारी आहेत. ऑटोनगर येथील जबाबदारी महापालिकेच्या दक्षिण उपविभाग 1 चे साहाय्यक कार्यकारी अभियंते सुरेश मूर्तेन्नावर यांच्याकडे देऊन येथेही 6 कर्मचारी सोबत असतील. कंग्राळी मुख्य रस्त्यावरी बाजाराची जबाबदारी महापालिकेचे सहाय्यक नगररचना अधिकारी अशोक गदग यांच्याकडे असून त्यांनाही सहाजण मदतीला असतील. यामुळे आता शेतकऱ्यांना आपली उत्पादने, भाजीपाला व ईतर माल घेऊन या तीन ठिकाणी जावे लागणार आहे.