बेळगाव ता. चिकोडी : कोरोनापासून सामान्य माणूस वाचला पाहिजे अशी मागणी करत माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी गुरुवारी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले आहे. चिकोडी तालुका सरकारी इस्पितळास भेट देऊन त्यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना व डॉक्टर डॉ. संतोष कोण्णूर यांना धारेवर धरले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून व्हेंटिलेटर न लावल्यास कोरोना रुग्ण कसा वाचणार...? असा सवाल करत आम्हाला सांगा ना काय हवं, सांगा आम्ही स्वखर्चाने देतो, देवाने आम्हाला काय कमी केले नसून कोरोनापासून सामान्य माणूस वाचला पाहिजे अशी मागणी माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी केली.
डॉक्टरांना वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत म्हणे की व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सुरू करू नका. पाऊस किंवा वाऱ्यामुळे वीजपुरवठा नसल्यास किंवा इतर कारण सांगून उपचार थांबविणे चुकीचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऐकून व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बंद केल्यास कोरोना रुग्ण कसा वाचणार..? इस्पितळात काय हवं ते सांगा. रुग्ण मरत असतानाही केवळ ऑक्सिजन कमी आहे म्हणून व्हेंटिलेटर लावले नाही, ऑक्सिजन कमी असल्याची बाब मला का सांगितली नाही? ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यास प्रतिबंध करणाऱ्या एका डॉक्टरला माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी चांगलेच फैलावर घेतले.
माझ्या व आमदार गणेश हुकेरींच्या निदर्शनास आणून द्या. आम्हाला देवाने कमी केलेले नाही. काय हवं ते द्यायला आम्ही तयार आहोत. एकही माणूस कोरोनाने मरु नये, इस्पितळात कोणत्याही चुकीने निष्पाप जीव जाऊ नये. कोरोना संकटात माणुसकी जपुया, असे हुक्केरी यांनी सांगितले .मी येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. या इस्पितळात काही चूक होऊ नये, त्याचा लोकांना फटका बसू नये. जर तसे काही झाल्यास तुम्हालाच जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देत, तुम्हाला जमत नसेल तर सोडून जा, तुमच्या जागी सरकारने डॉक्टर नेमला नाही तर आम्ही पैसे देऊन डॉक्टर नेमू असे प्रकाश हुक्केरी यांनी डॉ. कोण्णूरे यांना सुनावले.