मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर येडियुरप्पांनी वाढवलं भाजप नेतृत्वाचं टेन्शन

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता राज्यभरात यात्रा काढणार आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता ते भाजपला पुन्हा अडचणीत आणू शकतात. ही यात्रा हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे, अशी भीती भाजप नेतृत्वाला सतावत आहे.
राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी स्वतंत्रपणे राज्याच्या यात्रेची घोषणा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना स्थान नसेल. या दौऱ्यात येडियुरप्पा हे भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. यामुळे पक्ष नेतृत्व धास्तावले आहे. नेतृत्वाने केलेल्या विनंतीनंतर केवळ प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनाच यात्रेत सहभागी करुन घेण्यास येडियुरप्पांनी होकार दर्शवला आहे. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर दोन महिन्यांत पक्षाने त्यांच्यावर कोणतीच संघटनात्मक जबाबदारी टाकलेली नाही. यामुळे येडियुरप्पा हे नाराज आहेत.
येडियुरप्पांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता ते भाजपला पुन्हा अडचणीत आणू शकतात. त्यांनी 2013 मध्ये भाजप सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी काँग्रेसला विजय मिळाला होता. येडियुरप्पांनी त्यावेळी मोजक्या जागा मिळाल्या तरी भाजपचा पराभव करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. माहितीनुसार, येडियुरप्पांचा लिंगायत समाज आणि मठांवर मोठा प्रभाव आहे. ते आपला वारसदार म्हणून पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना समोर आणत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून येडियुरप्पा हे विजयेंद्र यांच्या राजकीय कारकिर्दीला बळ देतील आणि मुख्यमंत्री बोम्मई यांचे महत्व कमी करतील, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. येडियुरप्पा हे यात्रेच्या नावाखाली त्यांच्या समर्थकांना एकत्र करतील, अशीही भीती भाजप नेत्यांना सतावत आहे. कुटुंबाला कोणताही राजकीय फायदा असल्याशिवाय येडियुरप्पा हे यात्रा करणार नाहीत, असा भाजप नेत्यांचा कयास आहे.
येडियुरप्पांच्या दौऱ्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातून भाजपमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. येडियुरप्पांच्या यात्रेची तारीख स्वातंत्र्यदिनानंतर ठरली होती. नंतर पक्ष नेतृत्वाने विनंती केल्यानंतर गणेश विसर्जनानंतर यात्रा सुरू करण्याचे येडियुरप्पांनी मान्य केले होते. नंतर ही तारीख विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले. येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर येडियुरप्पांनी वाढवलं भाजप नेतृत्वाचं टेन्शन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm