ccb-belgaum-city-corporation-belgaum-marathi-board-removed-born-death-certificate-202110.jpg | बेळगाव महापालिकेत कानडीकरणाचा वरवंटा; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव महापालिकेत कानडीकरणाचा वरवंटा;

belgavkar.com | belgaum | belgavkar

ते मराठी फलक हटवून केवळ कन्नड व इंग्रजी फलक लावले

बेळगाव : महापालिकेत कानडीकरणाचा वरवंटा जोरात फिरु लागल्याचे दिसत आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसंबंधी माहिती देणारे तीन भाषेतील फलक महापालिकेने 23 सप्टेंबर रोजी लावले होते. त्यातील मराठी फलक हटवून केवळ कन्नड व इंग्रजी फलक लावले आहेत. याबाबत विभागातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी नेमके उत्तर दिले नाही. त्यामुळे, मराठी फलक हटविण्यामागचा बोलविता धनी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, काही सुधारणा करुन मराठी भाषेतील फलक पुन्हा लावले जातील, असे आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांचे म्हणणे आहे.
मराठी, कन्नड व इंग्रजी असे तिन्ही भाषेतील फलक एकाचवेळी हटविण्यात आले. पण, केवळ कन्नड व इंग्रजी भाषेतील फलक नव्याने तयार करून पुन्हा लावण्यात आले. मराठी फलक तयार करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पण, ते अद्याप तयार का झाले नाहीत, असा प्रश्न आहे. जन्म व मृत्यू नोंद महापालिकेत केली जाते. काही रुग्णालयांत थेट ऑनलाईन जन्म व मृत्यू नोंदणी सुरु आहे. पण, दाखले महापालिकेकडूनच दिले जातात. त्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती बहुतेकांना नाही. दाखल्यात काही दुरुस्ती आवश्यक असेल तरीही महापालिकेकडेच अर्ज करावा लागतो. त्यासाठी अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे जोडावीत याची माहितीही लोकांना नाही. त्याचा गैरफायदा एजंटांकडून घेतला जातो.
त्यामुळे, महापालिकेने अर्ज व कागदपत्रांबाबतची माहिती देणारे तीन भाषेतील फलक लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 23 सप्टेंबर रोजी मराठी, कन्नड व इंग्रजी भाषेतील फलक विभागासमोर लावले. त्याच काळात कानडीकरणाचा वाद सुरु असताना महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक झाले. पण, काही दिवसांतच महापालिकेने मराठी भाषेतील फलक काढले. त्यामुळे मराठी भाषिकांना अर्ज दाखल करण्यासाठी एजंटांची मदत घ्यावी लागणार आहे.