बेळगाव : अनगोळ शिवारातील भूसंपादनास तीव्र विरोध

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हालगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी सुपीक जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता बुडाकडून अनगोळ शिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची 150 एकर जमीन संपादनाचा घाट रचला जात असून याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच बुडाने पिकाऊ जमीन भूसंपादन करून विकास योजना राबविण्यापेक्षा अन्यत्र पडीक जमिनीमध्ये त्या राबवाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
बेळगाव परिसरात हवीतेवढी पडिक जमीन असतानांही अल्पभूधारक आणि कायद्याची कल्पना नसलेल्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी विकासाच्या नांवे भूसंपादन करुन त्यांची कुटूंबच संपवायचे षडयंत्र सूरु आहे. बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपाससाठी शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असतानांही जवळपास 150/200 एकर जमीन भुसंपादन केल्याने याच्याविरोधात सदर पट्टयातील शेतकऱ्यानी बँकेत कर्ज काढून उच्च न्यायालयात दावा दाखल करुन न्याय मिळवला. तरीही त्या आदेशाला न जुमानता पोलिस फौजफाट्यासह ठेकेदाराने बायपासचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या मदतीने येथील शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. यावरुन सरकार शेतकऱ्यांचा आणि उच्च न्यायालयाचा किती आदर करते हे दिसतच आहे. आता त्याच धर्तीवर अनगोळ शिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची जवळपास 150 एकर पीकाऊ जमीन भूसंपादन करणार असे समजताच तेथील शेतकऱ्यांनीही मोठा विरोध केला आहे.