बेळगाव : सीमेवरील आरटीपीसीआर रद्दची बेळगाव जिल्हाधिकार्‍यांकडून पुन्हा एकदा शिफारस...

belgavkar.com | belgaum | belgavkar

सीमेवरील तपासणी नाक्यांवर आरटीपीसीआरचा अहवाल करूनच कर्नाटकात प्रवेश

कर्नाटक - बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रवेशासाठीची आरटीपीसीआर कोरोना तपासणीची सक्ती रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी पुन्हा एकदा केली आहे. जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कोरोना संदर्भात चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सध्या कोरोना चा संसर्ग दर 0.15 टक्के इतका आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव्ह अहवालाची सक्ती रद्द करावी अशी मागणी केली.
त्यासंदर्भात आठवडाभरात निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्य सचिव यांनी दिली आहे. यापूर्वी दसरा सणाच्या आधी जिल्हाधिकार्‍यांनी सरकारला पत्र पाठवून वरील सक्ती रद्द करण्याची शिफारस केली होती. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तांत्रिक सल्लागार समिती बरोबर चर्चा करून आरटीपीसीआर रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. या महिन्याच्या 17 तारखेला तांत्रिक समितीची बैठक पार पडली या बैठकीत कोरुना नियम शिथिल करण्याचा निर्णय झाला; पण आरटीपीसीआर सक्ती रद्दचा निर्णय झालेला नाही.
महाराष्ट्र, गोवा व केरळ या तीन राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करतानाची आरटीपीसीआर तपासणीची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केलेली नाही. ही सक्ती रद्द करण्याबाबतचा निर्णय दसऱ्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते. आरटीपीसीआर सक्ती रद्दबाबत सीमाभागातील नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर राज्य शासनाने महाराष्ट्र व गोव्यातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर सक्ती केली होती. प्रारंभी सीमेवरील सर्व तपासणी नाक्यांवर ही सक्ती होती. सध्या कोगनोळी व कागवाड या ठिकाणी ही सक्ती काटेकोरपणे केली जात आहे. ही सक्ती रद्द झाली तर आंतरराज्य बससेवा सुरू झाली असती, पण सक्ती कायम राहिल्याने बससेवा सुरू होण्यास विलंब लागणार आहे.