बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 मुले जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चार मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्ताचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शहरातील हनुमाननगर, जयनगर, विनायकनगर आणि लक्ष्मी टेकडी येथे या घटना घडल्या आहेत.
या भागामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असून महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचा आरोप केला जात आहे. खेळत असताना मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जखमी मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहीजणांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेकडून नसबंदी मोहीम राबविण्यात आली. मात्र याला अपेक्षित यश आलेले नाही. याबाबत अनेकवेळा बैठक घेण्यात आली आहे. मात्र, यावर ठोस निर्णय झाला नाही. नसबंदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. महानगरपालिकेने यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर तरी महापालिका जागे होणार का, असा सवाल करण्यात येत आहे.