बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग; आता पुन्हा शोधावा लागणार ठेकेदार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाचे काम रेल इंडिया टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (राईट्स) कंपनीकडून केले जाणार नसल्याचे रेल्वे खात्याने स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या या कंपनीची स्थापना 1974 मध्ये झाली आहे. या कामासाठी आता दुसऱ्या कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. चार महिन्यापूर्वीच बेळगाव धारवाडसह देशातील प्रमुख रेल्वेमार्गांच्या निर्मितीच्या कामाचा ठेका राईट्सला देण्यात आला होता. तब्बल 4027 कोटी रुपयांचे काम राईट्सला देण्यात आले होते. पण, आता हे काम राईट्स करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

#belgaum #belgavkar #belgav #बेळगाव

बेळगाव-धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठीचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यासाठी बेळगाव तालुक्यातील काही गावांतील शेती संपादीत केली जाणार आहे. त्यामुळे, राजहंसगड, नंदीहळ्ळी भागातील शेतकऱ्यांनी सर्वेक्षण बंद पाडले आहे. त्यामुळे प्रकल्पात अडथळे येणार अशी चर्चा सुरु झाली होती. विरोध असतानाही रेल्वेने राईट्स कंपनीला ठेका दिला होता. याशिवाय कर्नाटकातीलच शिमोगा-शिकारीपूर, राणेबेन्नूर-तुमकूर-दावणगेरे या रेल्वे मार्गाचेही काम कंपनीला मिळाले होते. रेल्वे खात्याकडून 30 नोव्हेंबर रोजी याबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. बेळगाव व धारवाड या दोन शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे. पण, बेळगाव-धारवाड या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग हवा अशी मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडून होता.
2019 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी हा रेल्वेमार्ग मंजूर केला. शिवाय रेल्वेमार्गाचे काम सुरु व्हावे यासाठी पाठपुरावा केला. भूसंपादनाचा खर्च देण्याची तयारी राज्य शासनाने दाखविली. शिवाय चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात त्याबाबतची तरतूदही करण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वेने सर्वेक्षणाला सुरवात केली. राईट्स कंपनीला कामाचा ठेका दिल्यामुळे काम सुरु होणार हे नक्की झाले होते. आता ठेकेदार बदलल्यामुळे या कामाच्या प्रारंभाला विलंब लागू शकतो.
बेळगाव -धारवाड (व्हाया कित्तूर 73 किमी - 335 हेक्टर जमीन) या मार्गासाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. बेळगाव - कितूर - धारवाड (Belgaum to Dharwad via Kittur या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. आता या रेल्वे मार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बेळगाव व धारवाड जिल्ह्यातील एकूण 335 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. नियोजित बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वे मार्गामध्ये शेकडो हेक्टर सुपीक जमीन जाणार आहे. बेळगाव - धारवाड नूतन रेल्वेमार्ग नंदिहळ्ळी, गर्लगुंजी व नागेनहट्टी गावावरुन जाणार आहे. बेळगाव धारवाड या नव्या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 927 कोटी रुपये खर्च येणार आहे. 73 कि. मी. रेल्वे मार्गासाठी एकेरी रेल्वेमार्ग घालण्यात येणार आहे.
कितूरमार्गे होणाऱ्या नव्या रेल्वे मार्गामुळे तासाभरात बेळगाव - धारवाड असा रेल्वे प्रवास करता येणार आहे. तसेच 31 कि. मी. चे अंतर कमी होणार असल्याने वाहतुकीलाही चालना मिळणार आहे. या नवीन मार्गावर बेळगाव सह देसुर, के.के.कोप्प, बागेवाडी, एम. के. हुबळी, हूलीकट्टी, कित्तूर, तेगुर, ममिगट्टी, क्यारीकोप्प आणि धारवाड अशी स्थानके असतील.
2012 मध्ये सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. या रेल्वे मार्गावर एकूण 13 थांबे असतील. त्यात हालगा, गणीकोप्प, तिगडी, संपगाव, बैलवाड, बैलहोंगल, नेगीनहाळ, हुन्शीकट्टी, कित्तूर, तेगूर, हेग्गेरी, मोमीनगट्टी, क्यारकोप्प यांचा समावेश आहे. बेळगाव व क्यारकोप येथे रेल्वे जंक्शन होणार आहे. या मार्गातील रेल्वेचा प्रवास कमी खर्चात व कमी वेळेत होणार आहे. बेळगाव व धारवाड ही दोन शहरे नव्या रेल्वे मार्गामुळे आणखी जवळ येणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांच्या विकासाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे.