बेळगाव : येळ्ळूरमधील सोसायटीच्या चेअरमन-सेक्रेटरीवर गुन्हा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : येळ्ळूरमधील न्यू सैनिक सोसायटीच्या ग्राहकाला बचत खात्यावरील रक्कम परत दिली नाही. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने न्यू सैनिक सोसायटीचे चेअरमन जी. आय. पाटील आणि सेक्रेटरी मेघराज कुगजी, संचालक सिद्धेश्वर दणकारे, संचालक प्रकाश बी. पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
न्यू सैनिक सोसायटीचे ग्राहक श्रीधर मारुती पाटील यांनी या सोसायटीमध्ये RD भरली होती. ती रक्कम बचत खात्यावर (Saving) वर्ग करण्यात आली. एकूण ₹ 35108 रुपये ती रक्कम होती. 5 जानेवारी 2021 रोजी ती रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर ती रक्कम काढण्यासाठी श्रीधर पाटील यांनी सोसायटीमध्ये गेले. मात्र ती देण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर श्रीधर पाटील यांनी ग्राहक न्यायालयात त्यांच्या विरोधात खटला दाखल केला.
15 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयाने श्रीधर पाटील यांना दोन महिन्यांच्या आत 35108 रुपये सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर 3000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. मात्र त्यानंतरही ही रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने या दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर चेअरमनसह सेक्रेटरी व संचालकांना नोटीस बजावली आहे. यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले.