बेळगाव : 87 जणांविरुद्ध गुन्हा;
बँक फसवणूक प्रकरणात 55 पुरुष, 32 महिला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बनावट दागिने ठेवून बँकेची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक

बेळगाव ता. निपाणी : सौंदलगा येथील राष्ट्रीयीकृत असलेल्या युनियन बँकेत बनावट दागिने ठेवून बँकेची तब्बल ₹ 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार निपाणी ग्रामीण पोलिसांत नोंद झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 87 जणांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान तपास पथकाने पहिल्या टप्प्यात संशयित कर्जदारांची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासाला गती दिली आहे. तपास पथकाला फसवणूक करणाऱ्यांमध्ये 55 पुरुष व 32 महिला असल्याचे दिसून आले. यामध्ये स्थानिक तसेच निपाणी, कागल, बेळगाव, कोल्हापूर येथील नागरिकांचा समावेश आहे. सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून तपास सुरू केला आहे.
सौंदलगा येथे मध्यवर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून युनियन बँकेची शाखा भाडोत्री इमारतीत कार्यरत आहे. यापूर्वी ही बँक कार्पोरेशन बँक म्हणून ओळखली जात होती. अलीकडेच या बँकेचे विलीनीकरण झाले आहे. 7 जुलै 2021 रोजी बँकेचे तत्कालीन मॅनेजर बदलल्यानंतर नरेश आप्पासाहेब हलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर हलकर्णी यांनी बँकेतून सोने ठेवून कर्जाऊ रक्कम उचल केलेल्या कर्जदारांकडे वसुली चालवली होती. दरम्यान, सोने ठेवून कर्ज ठेवलेल्या 87 जणांनी बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक केल्याचे हलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यानुसार हलकर्णी यांनी ही बाब वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठांनी लेखा परीक्षणाला तातडीने सुरुवात केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण 87 जणांनी आपल्या मालकीचे सोन्याचे बनावट दागिने ठेवून 3 कोटी रुपयांची उचल केल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात येताच बँकेचे मॅनेजर नरेश हलकर्णी यांनी याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांत 87 जणांविरोधात फिर्याद दिली.
या प्रकरणाची जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीएसपी मनोजकुमार नायक यांनी गंभीर दखल घेतली. त्यानुसार सीपीआय संगमेश शिवयोगी व ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी हलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार 87 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे. 87 जणांनी फसवणूक कशी केली, बँकेने इतक्या लोकांचे बनवाट दागिने कसे स्वीकारले, हेही प्रश्न असून त्याचाही तपास सुरू आहे. तपास यंत्रणेने कमालीची गुप्तता पाळून या प्रकरणाचा तपास चालविला असून लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपींना गजाआड करण्यात येईल, अशी माहिती उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी दिली.


सहकार क्षेत्रात खळबळ
युनियन बँकेत बनावट सोन्या ठेवून तीन कोटीची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीला आल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये अनेक खाजगी व सहकारी बँकांनी अशाप्रकारे सोने ठेवून कर्जाऊ रक्कम दिली आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 87 जणांविरुद्ध गुन्हा; बँक फसवणूक प्रकरणात 55 पुरुष, 32 महिला
बनावट दागिने ठेवून बँकेची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm