कर्नाटक : सध्यातरी मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही प्रस्ताव नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात 4 पदे रिक्त आहेत. ती कधी भरायची..? कुणाला संधी द्यायची..? याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. त्यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, महामंडळ आणि प्राधिकरणांवर नियुक्त्या करण्याविषयी चर्चा व्हावयाची आहे. पक्ष पातळीवर याबाबत निर्णय घेतला जाईल.
पक्षश्रेष्ठींपुढे सर्व विषय मांडण्यात येणार आहेत. दिल्लीचे बोलावणे आल्यानंतर श्रेष्ठींना सविस्तर माहिती दिली जाईल. बेळगावात मंत्री उमेश कत्ती यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीविषयी कोणतीही माहिती नाही. अनेकदा एकाच ठिकाणी मंत्री, आमदार बैठक घेतात. भाजप आणि काँग्रेसमध्येही अशा बैठका होतात. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.