belgaum-Three-arrested-Burglary-in-Belgaum-city-and-suburbs-Belgaum-202205.jpg | बेळगाव : तिघांना अटक; बेळगाव शहर आणि उपनगरांत घरफोड्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तिघांना अटक; बेळगाव शहर आणि उपनगरांत घरफोड्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरांत घरफोड्या करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. शनिवारी एपीएमसी पोलिसांनी कारवाई केली असून त्यानी आतापर्यंत 9 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 19 लाख 47 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ख्वाजा अस्लम ऊर्फ रफिक सय्यद ऊर्फ शेख (वय 32, रा. सत्यसाई कॉलनी, वैभवनगर), इरफान खताल शेख (वय 32, रा. सत्यसाई कॉलनी, वैभवनगर आणि तंजिम इस्माईल खानापुरी (वय 30 रा. बाजारपेठ, खानापूर सध्या रा. घर नंबर 101 तिसरा क्लॉस रजाई मदरसा नजीक, सिद्धेश्वरनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
काही दिवसांपासून शहर व उपनगरात सातत्याने दिवसा तसेच रात्री बंद घरे फोडण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिस चोरट्यांच्या मागावर आहेत. 23 मे रोजी टीव्ही सेंटरमधील बालाजी शिवलिंगप्पा सावळगी यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास हाती घेतला होता. वरील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहर व उपनगरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नऊ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून 75000 रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, लाख 32 हजार 625 रुपये किमतीचे 17 किलो 425 ग्रॅम चांदीचे दागिने, एक हजार रुपयांची रोकड, 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या चार टीव्ही आणि सहा लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण 19 लाख 47 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या गुन्हे विभागाच्या पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, नारायण बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.