फिरायला गेलेल्या चंदगडच्या 11 तरुणांना गोव्यात लुटले, मारहाण करत नग्न व्हिडीओ बनवला

belgavkar.com | belgaum | belgavkar

चंदगड : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील 11 तरुणांना चार ते पाच अज्ञातांनी बेदम मारहाण करत लुटले. तर, त्यांच्याकडून पैसे व मोबाईल काढून घेऊन त्यांचा नग्न व्हिडिओ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी गोव्यात घडली. याबाबत पीडित तरुण म्हापसा पोलिसात तक्रार करणार आहेत. तर, आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी चंदगड पोलिसांकडे निवेदनातून पीडितांनी केली. याबाबत माहिती अशी की, चंदगड तालुक्यातील अकरा तरुण गोव्याला फिरायला गेले होते. गुरुवारी ते गावी परत येत असताना गोव्यातील अज्ञातांनी त्यांना बोंडगेश्वर मंदिराशेजारी अडविले व आमच्याकडे जेवण चांगले मिळते असे सांगत गाडी एका निर्जनस्थळी नेली. त्यानंतर गाडीतील सर्वांना एका हाँटेलच्या खोलीमध्ये कोंडले.
त्यांच्याकडून पैसे, मोबाईल, अंगठी व चेनही काढून घेतले. इतकेच नाही तर, तरुणांना नातेवाईकांकडून ऑनलाईन पैसे मागवून द्या, नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे भयभयीत झालेल्या तरुणांनी पैसे मागवून त्यांना दिले.त्यानंतर अज्ञातांनी आपल्या आणखीन तीन ते चार साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतरही बेदम मारहाण करत पीडित तरुणांचा नग्न व्हिडीओही तयार करुन याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास तुमचे नग्न व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणार व तुम्हाला जिवंतही सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यानंतर अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत तरुणांनी आपले गाव गाठले.
सर्वच तरुण दोन दिवस तणावाखाली
घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच तरुण गेले दोन दिवस तणावाखाली होते. त्यामुळे याबाबत त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र पीडित तरुणांनी आज, शनिवारी झालेल्या प्रकाराला वाचा फोडली. सामाजिक कार्यकर्ते अँड. संतोष मळविकर यांच्या कानावर घडलेला प्रकार घातला. त्यानंतर पिडीतांना धीर देत पोलीस संरक्षणासाठी चंदगड पोलिसांना निवेदन दिले. निवेदनावर अँड. संतोष मळविकर, समीर शिंदे, सतीश आपटेकर, सुभाष गावडे, प्रविण पाटील, मनोज शिंदे, अभिषेक पाटील, निखिल गावडे, नितीन गावडे, रोहित गावडे, सागर हसूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. चंदगड तालुक्यातील तरूणांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी म्हापसा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती अँड. मळविकर यांनी दिली.