belgaum-hindlaga-1-june.jpg | बेळगाव : हुतात्म्यांना 1 जून रोजी अभिवादन; शहर समितीच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : हुतात्म्यांना 1 जून रोजी अभिवादन; शहर समितीच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कन्नड सक्तीविरोधात 1 जून 1986 रोजी हिंडलगा, बेळगुंदी व बेळगाव परिसरात आंदोलन झाले. आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बेछुट गोळीबारात 9 सीमावासियांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना प्रत्येक वर्षी सीमावासीय अभिवादन करतात. 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली वाहिली जाणार आहे. यावेळी सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, यासाठी शहर तसेच ग्रामीण भागात जागृती केली जात आहे.
मध्यवर्ती म. ए. समिती, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी यांच्यावतीने गल्लोगल्ली, गावोगावी जाऊन हुतात्मा दिनाची जागृती केली जात आहे. तालुका म. ए. समितीने झाडशहापूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, देसूर, वाघवडे, किणये, बेळगुंदी या परिसरात जागृती बैठका घेऊन सीमावासियांना हुतात्मा दिनासोबत सीमाप्रश्नाचा खटला व मराठा कागदपत्रांसाठीची लढाई याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार 30 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत हुतात्मा दिन, भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न, जिल्हाधिकार्‍यांना द्यावयाचे निवेदन याविषयी चर्चा केली जाणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन शहर समितीतर्फे करण्यात आले आहे.