महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल;

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल;

belgavkar.com | belgaum | belgavkar

लाज असती तर… म्हणत बंडखोरांवर टीका

बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोंडे बंद पडतील

महाराष्ट्र : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामध्ये भाजपाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. एकीकडे चंद्रकांत पाटील यांनी याच्याशी भाजपाचा संबंध नसल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी काही दिवसांमध्ये राज्यात भाजपाची सत्ता येईल असं विधान केल्याकडे लक्ष वेधत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. तसेच सरकारच्या आणि शिवसेनेच्या बाजूने उभे राहणाऱ्याविरोधात ‘ईडी’चे फास आवळले जातात असंही शिवसेनेनं म्हटलंय. तसेच ‘भाजपाचे सरकार आले तरी महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?,’ असा प्रश्नही शिवसेनेनं विचारलाय.
“भारतीय जनता पक्षाची अलीकडच्या काळातील वक्तव्ये जनतेला गोंधळात टाकणारी आहेत. एका बाजूला चंद्रकांत पाटलांनी सांगायचे, शिवसेनेत जे सुरू आहे त्याच्याशी आपला संबंध नाही. तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्याच वेळी रावसाहेब दानवे यांनी अंगास हळद लावून व मुंडावळ्या बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक-दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपाचे सरकार येईल.’ शिवसेनेतील बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे व दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपाचे सरकार येईल, असे बोलायचे. त्यामुळे खरे काय? मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“गुवाहाटीमधील आमदार मंडळी शहा यांच्याशी झालेल्या संवादानंतर इतकी खूश झाली की, त्यांनी आपला आसाममधील मुक्काम आणखी सात दिवस वाढविला आहे. बंडखोर आमदारांना जे करायचे त्यासाठी ते मुखत्यार आहेत त्यात सात-आठ मंत्री आहेत, आमदार आहेत. आपली मंत्रालये, विभाग सोडून ते महाराष्ट्राबाहेर जाऊन बसले आहेत. कृषी, उच्च शिक्षण, पाणीपुरवठा, फलोत्पादन वगैरे खाती जनतेच्या जिव्हाळ्याची आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलात बसले आहेत. जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन ते राज्याबाहेर गेले असते, पण शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेवून ते तत्त्वाची भाषा करीत आहेत,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला.
“आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपामुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत? महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपामधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपाच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांचे काय सांगणे आहे? जो भाजपा सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करीत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे उद्योग नक्की कोण करीत आहे? हे डाव आता उघड झाले असूनही ही मंडळी त्यांच्याच नावाचा गजर करीत आहेत. पुन्हा सरकार व शिवसेनेच्या बाजूने जे उभे आहेत, त्यांच्यावर ‘ईडी’चे फास आवळून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरूच आहे. हे सर्व खेळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी किती काळ चालणार? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठेचे व स्वराज्य प्रेमाचे दाखले आपण देतो, ते स्वराज्य प्रेम आज कोठे गेले? बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि हे असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे. ‘‘महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू,’’ असे शिवसेनेपैकी कोणी बोलले तर ‘‘यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होSS,’’ म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोंडे बंद पडतील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले,” अशी आठवण शिवसेनेनं करुन दिली.
“भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल;
लाज असती तर… म्हणत बंडखोरांवर टीका

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm