husband-cut-his-wifes-throat-in-premises-of-local-court-in-hassan-karnataka-202208.jpeg | धक्कादायक....! न्यायालयात घटस्फोटाची सुनावणी, कोर्ट रुमबाहेर येताच पत्नीचा चिरला गळा | belgaum news | belgavkar बेळगावकर

धक्कादायक....! न्यायालयात घटस्फोटाची सुनावणी, कोर्ट रुमबाहेर येताच पत्नीचा चिरला गळा

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोर्टात एकत्र राहण्याचे वचन दिलं आणि बाहेर येताच.., कर्नाटकातील धक्कादायक घटना

न्यायाधीशांच्या समुपदेशनानंतर एकत्र राहण्यास होकार दिला, बाहेर येताच पत्नी-मुलीवर हल्ला केला.

कर्नाटकातील हासन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी स्थानिक न्यायालयाच्या आवारात पतीने सर्वांसमोर पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला. आरोपीने त्याच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याने जाणाऱ्यांनी मुलीला वाचवले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. मिळालेल्या माहितीनुसार, घटना होलेनर्सीपुरा टाऊन कोर्ट कॉम्प्लेक्समधील आहे. चैत्रा असे मृत महिलेचे नाव असून ती थत्तेकेरे गावातील रहिवासी आहे. महिलेचा आरोपी पती शिवकुमार हा येथील होलेनर्सीपुरा तालुक्यातील रहिवासी आहे. चैत्रा आणि शिवकुमार यांच्यातील घटस्फोट प्रकरणाची सुनावणी हसन जिल्ह्यातील नरसीपुरा न्यायालयात सुरू होती. सुनावणीत न्यायाधीशांनी समुपदेशन केल्यानंतर दोघांनीही एकत्र राहण्यास होकार दिला. 
एकत्र राहण्याचे मान्य केले, पण...
दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना एक मुलगीही आहे. शनिवारी न्यायालयात न्यायाधीशांनी दाम्पत्याला घटस्फोटाची याचिका मागे घेण्यास सांगितले. मुलीच्या भविष्याचा विचार करून हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्यावर दोघांचा होकार आला. समुपदेशन सुमारे तासभर चालले, त्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आणि मुलीच्या हितासाठी एकत्र राहण्याचे मान्य केले. यानंतर चैत्रा न्यायालयाच्या आवारातील वॉशरूममध्ये गेली असता तिचा पती शिवकुमार तिच्या मागे आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. 
आरोपीने पाठीमागून येऊन चैत्राचा गळा चाकूने चिरला. यानंतर त्याने आपल्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आवाज ऐकून घटनास्थळी लोक जमा झाले आणि आरोपीला पकडले. नंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या हल्ल्यात चैत्रा गंभीर जखमी झाली. होले नरसीपुरा येथून त्यांना रुग्णवाहिकेतून हसनच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला.