शिक्षक शिकवत असताना अचानक बेशुद्ध पडला; दुसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा वर्गातच मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच हृदयद्रावक अंत; सरकारी शाळेतील घटनेनं खळबळ

नवी दिल्ली : एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशपाठोपाठ आता दिल्लीतही शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाचा मृत्यू नक्की कसा झाला हे कोणालाच समजलं नाही. आता यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. मुलाच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. त्यांनाही हे समजलं नाही, की त्यांच्या मुलासोबत नक्की असं काय झालं. प्रकरण रोहिणी भागातील एका सरकारी शाळेतील आहे. जिथे वर्गात बसलेल्या दुसऱ्या वर्गातील मुलाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गात बसलेला असतानाच हा मुलगा बेशुद्ध झाल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यानंतर मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणी पोस्टमॉर्टम केलं जाईल, जेणेकरून मुलाच्या मृत्यूचं कारण काय आहे हे कळू शकेल.
7 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 7 वीच्या विद्यार्थीनीचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला होता. यात शिक्षकाने वर्गातील तिला प्रश्न विचारला होता. विद्यार्थिनी उत्तर देत असतानाच तिचा मृत्यू झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं की जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, ज्यावर मुलगी उभी राहिली आणि म्हणाली की मी उत्तर देते. परंतु शिक्षकाने दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला. शिक्षक दुसर्‍या मुलीला प्रश्न विचारत असल्याने ती थोडी नाराज झाली. यानंतर अचानक विद्यार्थिनीने शेजारी बसलेल्या विद्यार्थिनीचा हात पकडला आणि नंतर ती अचानक खाली पडली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. यानंतर आता पुन्हा दिल्लीतून अशीच घटना समोर आली आहे.