सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेल्वे रुळावर फिरणाऱ्या मुलांचा भयानक अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकरी हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत तर अनेकजण तो पुन्हा पुन्हा बघत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी पूर्ण भरलेली एक रेल्वे पुलावरून जाताना दिसत आहे, काही लोक रेल्वेच्या दरवाजात उभे असल्याचंही दिसत आहे. ही रेल्वे पुढे येताच रेल्वे रुळावर फिरणारी मुलं अचानक पुलावरुन खाली उड्या मारताना दिसत आहेत.
व्हिडीओत रेल्वे जवळ येताच दोन मुलं रुळांच्या शेजारी उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवाय ते या रुळावर फोटो काढण्यासाठी गेल्याचं दिसत आहे. ही मुलं रुळाशेजारी उभी असतानाच रेल्वे आल्याने त्यांचा तोल बिघडतो आणि ते थेट खाली उडी मारतात. या मुलांच्या मागे उभा असलेला एक व्यक्ती रेल्वेचा व्हिडिओ शूट करत होता, यावेळी त्याच्या कॅमेऱ्यात ही सर्व धक्कादायक घटना कैद झाली आहे. तर मुलांचा तोल बिघडल्यामुळे ते खाली पडल्याचं पाहून ट्रेनमधील प्रवाशीही थक्क होतात. हा व्हिडिओ राजस्थानमधील हिल स्टेशन गोराम घाटाजवळील असल्याचं सांगण्यात येत आहे (Goram Ghat In Rajasthan).
नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणीदरम्यान व्हिडीओमध्ये रेल्वेच्या रुळावरुन खाली पडलेली दोन्ही मुलं सुखरूप असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हे तरुण पुलावरुन पडल्यानंतरही नागरिकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण लोकांचे म्हणणं आहे की, ही मुलं जाणूनबुजून रेल्वे पुलावर गेले होते, शिवाय अशा स्टंटमुळे भयानक अपघात होऊ शकतात. त्यामुळे असे कृत्य पुन्हा कोणी करू नये म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाया व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. श्रीकांत नायर नावाच्या युजरने लिहिलं, या तरुणांना अटक करून तुरुंगात पाठवले पाहिजे. ते सोशल मीडियावर चुकीच्या संदेश पसरवत आहेत अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “या मुलांनी मुद्दाम हा व्हिडिओ बनवला आहे, जिथे हे लोक पडले, ती जागा जास्त उंच दिसत नव्हती. याचा अर्थ कोणाचाही जीव गेला नाही. पण या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे.” हा व्हिडिओ @mallu_yaatrikar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 12 सप्टेंबर रोजी पोस्ट केल्यापासून या व्हिडीओला आतापर्यंत हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.