बेळगावात कन्नडसाठी फतवा

बेळगावात कन्नडसाठी फतवा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्हा प्रशासनाने कानडीकरणाचा फतवा काढला आहे. सर्व सरकारी कार्यालये, शाळा, रस्ते, उद्याने यांचे फलक, सरकारकडून आकारण्यात येणारी दंडची पावती आणि अंगणवाडीतील शिक्षणही कन्‍नडमध्येच देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे. यातून मराठी प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कन्‍नड अंमलबजावणी आणि विकास आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी महापालिका, पोलिस व इतर प्रशासकीय अधिकार्‍यांना कन्‍नडबाबत विविध सूचना केल्या.
सर्व सरकारी कार्यालये आणि शाळेंमध्ये ज्ञानपीठ विजेत्यांच्या प्रतिमा लावणे आणि दुकानांसमोर कन्‍नड भाषेत फलक लावणे बंधनकारक आहे.
30 नोव्हेंबरच्या आत या आदेशाचे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले. जिल्ह्यात कन्‍नडचा वापर वाढला पाहिजे, यासाठी सरकारी पातळीवर सर्व कामे कन्‍नडमधूनच करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले. शहरातील दुकानांवर कन्‍नडमध्ये फलक लावण्यात यावेत. ज्या दुकानदारांनी कन्‍नडमध्ये फलक लावण्यात आले नाहीत, त्यांना नोटीस काढण्यात यावी. मराठी शाळांमध्ये कन्‍नड शिक्षकांची कमतरता असू नये, कमतरता असलेल्या ठिकाणी कन्‍नड शिक्षकांची तत्काळ नियुक्‍ती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. घरातील भाषा मराठी असली तरी चालेल, पण अंगणवाडीमध्ये कन्‍नडमध्येच शिक्षण देण्यात यावे. शहरातील नव्या उद्यानांच्या फलकांवर कन्‍नडमध्ये फलक लावण्यात यावे. कन्‍नड लोकांची नावे देण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
परवान्यासाठी कन्‍नड बंधनकारक : व्यापार परवाना घेण्यासाठी कन्‍नड भाषेतील फलकाची सक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. याशिवाय परवाना नूतनीकरणावेळी कन्‍नड फलक आहे की नाही, याची खात्री करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जाहिराती कन्‍नडमध्ये असून उद्यानांत कन्‍नडमध्येच माहिती लिहिण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.


निपाणीत कन्‍नडचा वापर कमी : निपाणी परिसरात कन्‍नडचा वापर कमी आहे. त्याठिकाणी अधिक जोर लावावा लागणार आहे, अशी माहिती कन्‍नड जागृती समितीचे सदस्य अनंतकुमार बॅकोड यांनी दिली. अनेक कन्‍नड शाळांत इंग्रजी शिकवण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.
दंडाच्या पावती कन्‍नडमध्येच : पोलिस खात्याकडून आकारण्यात येत असलेल्या दंडाची पावती कन्‍नडमध्येच देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त विक्रम आमटे यांनी दिली. तक्रार अर्जही कन्‍नडमध्येच घेण्यात येत असून दोषारोप पत्र कन्‍नडमध्ये देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.


बैठकीला चिकोडी जिल्हाशिक्षणाधिकारी गजानन मन्‍नीकेरी, परिवहन खात्याचे अधिकारी शिवानंद मगदूम, माहिती आणि प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात कन्नडसाठी फतवा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm