belgaum-olympian-bandu-patil-hockey.jpg | बेळगाव : हॉकी स्टेडियमला ऑलिम्पियन व विख्यात हॉकीपटू बंडू पाटील यांचे नाव | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : हॉकी स्टेडियमला ऑलिम्पियन व विख्यात हॉकीपटू बंडू पाटील यांचे नाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रामतीर्थनगरमधील साडेसात एकर जागेत ऑलिम्पियन व विख्यात हॉकीपटू बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ हॉकी स्टेडियम उभारण्याचा निर्णय बेळगाव नगरविकास प्राधिकरण (बुडा BUDA - Belgaum Urban Development Authority) च्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांच्या अध्यक्षतेखाली बुडाची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी (27 नोव्हेंबर) झाली. रामतीर्थनगर येथे बुडाची जागा असून त्या जागेचा विकास करण्याचा निर्णय बुडाने आधीच घेतला आहे. त्या जागेत हॉकी स्टेडियम बांधण्याची मागणी होत होती.
हॉकी इंडिया बेळगाव या संस्थेने तसा प्रस्ताव बुडाकडे दिला आहे. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊन त्या जागेत हॉकी स्टेडियम बांधण्यास हॉकी इंडियाला मंजुरी देण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यामुळे आता रितसर त्या जागेचे हस्तांतर हॉकी इंडिया बेळगाव संस्थेकडे केले जाणार आहे. मूळचे बेळगावचे असलेले ऑलिम्पियन बंडू पाटील यांचे नाव नियोजित हॉकी स्टेडियमला देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला बुडाने रामतीर्थनगर येथेच जागा दिली होती. त्यात संघटनेने अद्ययावत क्रिकेट स्टेडियम उभारले आहे. त्याच धर्तीवर हॉकी स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे.