gowndwad-village-belgaum-taluka-stone-pelting-injured-temple-land-dispute-202012.jpg | बेळगाव : दोन गटात तुफान दगडफेक; तरूणावरील हल्ल्यानंतर गौंडवाड गावात तणावाचे वातावरण | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दोन गटात तुफान दगडफेक; तरूणावरील हल्ल्यानंतर गौंडवाड गावात तणावाचे वातावरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

देवस्थान जमिन वाद; 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

बेळगाव : गौंडवाड (ता. बेळगाव) येथील देवस्थान कमिटीच्या जागेचा वाद उफाळून आला आहे. यावरून सोमवारी मध्यरात्री गावातील दोन गटांत हाणामारी होऊन घरांवर तुफान दगडफेक झाली. यामध्ये काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे गावात तणाव असून, कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवस्थान जमिनीच्या वादातून काही जणांनी दगडाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. सोमवारी (30 नोव्हेंबर) रात्री 9.20 वाजण्याच्या सुमारास बॉक्साईट रोडवरील मराठा मंडळ डेंटल कॉलेजनजीक ही घटना घडली. सतीश राजेंद्र पाटील (वय 34, रा. गौंडवाड) असे जखमीचे नाव आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमीच्या नातेवाइकांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास संशयितांच्या घरावर तुफान दगडफेक करून तोडफोड केल्याने गौंडवाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गजानन यशवंत बिर्जे, मारुती नारायण पाटील, केदारी अशोक पाटील, किरण भरत पाटील, बसवंत केशव कुट्रे (सर्वजण रा. गौंडवाड) यांच्यासह अन्य एका अनोळखीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तर दगडफेकप्रकरणी काकती पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शाहू मल्लाप्पा पवार, विनायक बाबूराव पाटील, राजू संतू पाटील, उमेश तानाजी पाटील, जोतिबा भैरु पाटील (सर्वजण रा. गौंडवाड) अशी त्यांची नावे आहेत.
फिर्यादी सतीश आणि संशयितांमध्ये गौंडवाडमधील काळभैरवनाथ आणि कलमेश्वर मंदिराच्या जागेवरुन वाद सुरु आहे. त्यामुळे संशयितांनी त्याच्यावर राग धरला होता. सतीशचे मराठा मंडळ डेंटल कॉलेजनजीक मेडिकल आणि जनरल स्टोअर्स आहे. सोमवारी रात्री त्याठिकाणी सतीशला अर्वाच्च शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरवात केली. डोकीसह शरीरावर दगडाने हल्ला केला. त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. त्यानंतर संशयितांनी तिथून पलायन केले. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी सतीशने एपीएमसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 6 संशयिताविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या घटनेचे पडसाद मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास गौंडवाडमध्ये उमटले. सतीशच्या नातेवाईकांनी अशोक पाटील, भरत पाटील आणि गजानन पाटील यांच्या घरांवर दगडफेक करुन तोडफोड केली. तसेच वाहनांचे नुकसान केले.
1 एकर 20 गुंठे जमिनीचा वाद : इंदिरा गांधी ट्रिब्युनल अॅक्टनुसार अशोक पाटील, भरत पाटील यांना गावात 1 एकर 22 गुंठे जमीन मिळाली होती. सदर जमीन वटमुखत्यारपत्राद्वारे गजानन पाटील यांनी दुसऱ्याला विकली होती. ती जमीन गावकऱ्यांना हवी यासाठी हा हल्ला केल्याची नोंद पोलिसांत नोंद झाली आहे. दगडफेकीनंतर गावात बंदोबस्त ठेवला आहे.