बेळगाव : बेळगावमधील विमान प्रवाशांना नववर्षानिमित्त आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली बेळगाव ते चेन्नई अशी थेट विमानसेवा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. बेळगाव ते चेन्नईसाठी 2 फेब्रुवारीपासून थेट विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. इंडिगो विमान कंपनी ही सेवा सुरु करीत आहे. या सेवेमुळे बेळगाव येथील सांबरा विमानतळावरुन रोज 12 विमानांचे आगमन आणि 12 विमानांचे उड्डाण होणार आहे.
बेळगाव येथून हे विमान सकाळी 10.55 वाजता उड्डाण घेणार असून, दुपारी 1.15 वाजता चेन्नईला पोहोचणार आहे. त्याप्रमाणे चेन्नई येथून सकाळी 8.10 वाजता उड्डाण करणारे विमान बेळगावला सकाळी 10.25 वाजता पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशा 3 दिवसासाठी ही सेवा असणार आहे. या विमान सेवेमुळे चेन्नई हे बेळगावला हवाई मार्गे जोडले जाणारे देशातील 12 वे शहर ठरणार आहे.
25 जानेवारीला बेळगावहून नाशिकला विमानसेवा सुरु होत आहे. यामुळे बेळगावाच्या सांबरा विमानतळावरुन आता सर्वसाधारणपणे रोज 12 विमानांचे आगमन आणि 12 विमानांचे उड्डाण होणार आहे. बेळगावहून सध्या 10 शहरासाठी विमानसेवा सुरु आहे. सध्या 2 विमानांचा सांबरा विमानतळावर मुक्काम असतो. त्यामुळे बेळगाव हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. पहिल्या क्रमांकावर बंगळूर, दुसऱ्या क्रमांकावर मंगळूर विमानतळ आहे. व्यापारी, उद्योजक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.