belgaum-makar-sankrant-tilgul-function-202101.jpg | बेळगाव : समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही ही आमच्यात सामील व्हा... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही ही आमच्यात सामील व्हा...

belgavkar.com | belgaum | belgavkar

महिला स्वच्छता भगिनींसमवेत साजरा केला हळदी कुंकू...

बेळगाव :- तिळगुळ घ्या गोड बोला अशा शुभेच्छा एकमेकांना आपण देत असतो; मग लोकांच्या आरोग्याची काळजी घेत शहर स्वच्छतेच्या कामात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सोबत आपणच गोड का नाही बोलावे, हा संदेश देण्यासाठी बेळगावात एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. लवकरच बेळगावात सुरू होत असलेल्या भारतीय नाविक सेना युनियन यांच्यावतीने शहापूर येथील नेताजी सांस्कृतिक सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थांच्या महिलांसह स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात बहुसंख्येने उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाला माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यासह वेदांत सखी अध्यक्षा सविता सायनेकर, कोरोना योध्दा माधुरी जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय नाविक सेनेच्या बेळगाव प्रतिनिधी निशा पाटील आणि अश्वगंधा कुगजी यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू आणी वाण देऊन सन्मानित केले. कार्यक्रमासाठी नटूनथटून आलेल्या महिला भगिनी मधील पाच जणींना विशेष पारितोषिके देण्यात आली. यामध्ये अन्नपूर्णा निचळ (प्रथम), लक्ष्मी चलवादी (द्वितीय), श्रुतिका चव्हाण (तृतीय) यांना पैठणी साडी तर शामल पाटील व रेणु काकतीकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमाला विधवा महिलांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना ही यावेळी सर्वांसमवेत सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना नंदिहळ्ळी यांनी उपेक्षित आणि दुर्लक्षित महिलांना समाज प्रवाहात आणण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सविता सायनेकर यांनीही आपल्या मनोगतात मधून एका वेगळ्या प्रकारच्या प्रबोधनकारी कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन वैष्णवी काकतीकर यांनी केले प्रास्ताविक अश्वगंधा कुगजी तर आभार प्रदर्शन निशा पाटील यांनी केले.