belgaum-city-bus-and-villages-problem-rush-202101.jpg | बेळगाव : बसफेर्‍या कमी… प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची फरफट VIDEO | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बसफेर्‍या कमी… प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची फरफट VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता शाळा, काॅलेज सुरु झाल्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अपुर्‍या व अनियमित बससेवेमुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थीवर्गाची फरफट होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असून अपुर्‍या बससेवेमुळे दाटीवाटीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परिणामी कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने याची दखल घेऊन बसफेर्‍या वाढवून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.
YouTube Video

शाळा-महाविद्यालयांपाठोपाठ दहावी-बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याबरोबरच सहावी, सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम कार्यक्रमही सुरू झाला आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बसफेर अपुर्‍या असल्याने प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरू होत आहे. परिणामी गर्दी होऊन कोरोना नियमांचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे.
बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ सुरू असल्याचा धोकादायक प्रकार नुकताच आरपीडी कॉर्नरजवळ घडला होता. दरम्यान, बसचालकाने बसथांब्यावर बस न थांबविता पुढे नेली. विद्यार्थी बसमध्ये चढण्यासाठी बसच्या पाठीमागून धावताना दिसून आले. परिवहनने कोरोना संसर्गाबरोबर विद्यार्थीवर्गाचे होणारे अतोनात हाल लक्षात घेऊन बसफेर्‍या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना बसपास असूनही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसफेर्‍याच कमी असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये वेळेत पोहोचणे मुश्कील होत आहे. बसस्थानकातील बसपास विभागात बसपासचे काम सुरू आहे. त्यामुळे बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. विद्यार्थ्यांना बसस्थानकात फेर्‍या माराव्या लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होताना दिसत आहे.