YuvaSamitiBelgav.jpg | बेळगाव : तो ध्वज काढा, अन्यथा भगवा लावू; युवा समितीचा इशारा | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तो ध्वज काढा, अन्यथा भगवा लावू; युवा समितीचा इशारा

belgavkar.com | belgaum | belgavkar

त्यानंतर ते बैठकीतून बाहेर पडले...

बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या वेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. तो ध्वज काढा, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी भगवा लावू असा इशारा त्यांनी दिला. नेहमी मराठी भाषिकांची गळचेपी करणाऱ्या प्रशासनाने लाल-पिवळ्या ध्वजाच्या मुद्द्यावरून चालढकल सुरू केली आहे. याचा युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी निषेध केला. त्यानंतर ते बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या या भूमिकेचे सीमाभागातील मराठी भाषिकातून स्वागत होत आहे.
बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीररित्या फडकविण्यात आलेला लाल पिवळा ध्वज काढण्यासाठी मराठी भाषिकांनी घेतलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पावित्र्याने कर्नाटक प्रशासन ताळ्यावर आले. यासंदर्भात झालेल्या बैठकीत बेळगांव जिल्हा प्रशासनाच्या विनंती नुसार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आजचा नियोजित मोर्चा रद्द केला. दरम्यान, यासंदर्भात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांच्याशी चर्चा करून लाल पिवळा ध्वज हटविण्याबाबत त्वरित निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निर्वानीचा इशारा देण्यात आला. तर येत्या काही दिवसात निर्णय घेऊन योग्य कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
काही कन्नडिगांनी केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगाव महानगरपालिके समोर कर्नाटक सरकारचा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज फडकवला आहे. मराठी भाषिकांनी लोकशाही मार्गाने निवेदनाद्वारे यावर आक्षेप घेऊन सुद्धा कर्नाटक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने अखेर समिती आणि शिवसेनेच्या वतीने आज हा लाल पिवळा ध्वज हटविण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. महाराष्ट्रातूनही हजारो शिवसैनिक मोर्चात सहभागी होणार असल्याने वातावरण तंग बनले होते.

27 जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देत तूर्तास मोर्चा रद्द करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे सध्या पोलीस प्रशासना वरील वाढता ताण आणि ग्रामपंचायत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आजचा नियोजित मोर्चा तुर्त रद्द केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली.