बेळगाव : गेल्या 15 दिवसांत झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकातील मांजरी, रायबाग येथेही पुराचा फटका बसला आहे. पूर ओसरला असला तरीही अजून पाणी पूर्णपणे ओसरले नाही. अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. गेल्या आठवड्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्यावतीने चिपळूण, खेड रत्नागिरी येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली होती.
याचीच दखल घेऊन मांजरी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांनी बेळगावचे प्रमुख श्री किरण गावडे यांच्याशी संपर्क साधून मांजरी येथील पुरग्रस्तांसाठी मदतीची मागणी केली. लागलीच जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी 70 कुटुंबासाठी 15 दिवस पुरेल असे राशन किट तयार करून मांजरी येथे बेळगावमधील धारकर्यांकडून हे किट रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाडमध्ये सामाजिक, राजकीय संस्थांसह व्यक्ती तसेच विविध संस्थांकडून मदतीचा ओघ येत आहे.