बेळगाव ता. निपाणी - कोगनोळी : कोगनोळी येथे उभारलेल्या सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे कर्नाटकात कोरोनाला रोखण्यास मदत होत आहे. येथून महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्ट सक्तीचा आहे. त्याशिवाय कर्नाटकात प्रवेश देऊ नये, अशी सूचना राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक उमेश कुमार यांनी केली.
राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन कामाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक उमेश कुमार पुढे म्हणाले, सरकारने घातलेले निर्बंध हे हितासाठी असून नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या ठिकाणी कर्नाटकातील प्रवाशांसाठी आरटीपीसीआर रिपोर्टची सुविधा सीमा तपासणी नाक्यावर करण्यात आली आहे. कर्नाटकातील हा सीमा तपासणी नाका फार महत्वाचा असून वाहनधारकांसह प्रवाशांनी कर्मचार्यांना सहकार्य करावे.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, प्रांताधिकारी युकेशकुमार, निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक उपस्थित होते. यावेळी निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, चिक्कोडी तालुका आरोग्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, एएसआय एस. ए. टोलगी, अमर चंदनशिव, अभिजीत गायकवाड, तलाठी के. एल. पुजारी, आरोग्यसेविका राजश्री यांच्यासह पोलिस व आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि होमगार्ड उपस्थित होते.