बेळगाव : रविवारी येथील अंजुमन इंग्रजी माध्यम शाळेत एसडीए परीक्षा देण्यासाठी आलेल्या गोकाक तालुक्यातील एका तरुणाने आपल्या कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावल्याचे आढळून आले आहे. परीक्षार्थांची तपासणी करताना हा प्रकार लक्षात आला आहे. बेळगाव शहरात झालेल्या केपीएससी-एसडीए परीक्षेत हा फसवणूकीचा प्रकार घडल्याचे सामोरे आले आहे.
या प्रकरणी गोकाक तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध येथील मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर असे प्रकार घडले होते. या प्रकारांमागे गोकाक तालुक्यातील टोळी असल्याचे उघडकीस आले होते. प्राचार्यांनी तातडीने मार्केट पोलिसांना याची माहिती दिली असून पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. रात्री त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी पुढील तपास करीत आहेत.