बेळगाव : आपल्या जीवनात काही विशेष दिवस आपल्याला खूप सुख आणि आनंद घेऊन येतात. अनेक जण असे दिवस दरवर्षी अमाप पैसे खर्च करून भव्यतेने साजरे करु शकतात. पण काही उदार लोक त्यांचे हे खास दिवस वंचित आणि गरजू लोकांसोबत साजरा करुन त्यांच्या आनंदात आपला आनंद मानतात आणि मानवतेचा एक पायंडा पाडतात. बेळगावातील श्री. महेश जाधव आणि सौ. मधू जाधव या दाम्पत्याने एका गरजू महिलेला मदत करून आपला खास दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
नुकताच त्यांचा लग्नाचा पाचवा वाढदिवस झाला. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने एका महिलेच्या घराचे नूतनीकरण केले आहे. 23 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घराचे उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी बेळगाव महानगर भाजपचे सरचिटणीस श्री. मुरुगेंद्रगौडा पाटील आणि माजी नगरसेवक श्री. भैरगौडा पाटील हे या शुभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ही महिला बेळगांव मधील कणबर्गी येथील रहिवासी आहे. 3 महिन्यांपूर्वी तिच्या नवऱ्याचे निधन झाले. ही महिला तिच्या दोन मुलांसह गेल्या 25 वर्षापासून जुन्या घरात राहत होती. सततच्या पावसाने त्या जुन्या घरात राहणे अवघड झाले होते. तसेच, तिचे घरखर्च चालवण्यासाठी आणि तिच्या दोन मुलांना शिक्षण देण्यासाठी तिच्याकडे कोणतीही आर्थिक मदत नाही. महेश जाधव आणि मधु जाधव हे बेळगावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. महेश जाधव यांना विविध सामाजिक उपक्रमांबद्दल राष्ट्रीय पुरस्कार, तसेच राज्य आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सौ. मधु जाधव ह्या प्रयत्न हि संस्था चालवत आहेत. या संस्थेअंतर्गत महिला आणि लघुउद्योग, गृहउद्योग यांचे सबलिकरण करण्याचे कार्य त्या करत आहेत. या दाम्पत्याने पुढाकार घेऊन कणबर्गी येथील या महिलेच्या घराचे नूतनीकरण करून ते खूप कमी वेळात पूर्ण केले आहे. या कार्यासाठी त्यांना अंदाजे 2 लाख रुपये खर्च आला आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या लग्नाच्या 5 व्या वाढदिवसानिमित्त त्या महिलेच्या दोन मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतली आहे. महेश आणि मधु जाधव यांची ही दयाळू वृत्ती प्रशंसनीय आहे आणि इतरांना प्रेरणा देणारी आहे.