बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना आता कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या कक्षाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. याचबरोबर परिसरातही फवारणीही करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस तसेच सरकारी कर्मचार्यांना कोरोनाची लागण होत आहे. हा आकडा देखील मोठा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींची विचारपूस करुनच त्यांना आत प्रवेश दिला गेला आहे. दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता. तरी देखील जिल्हाधिकार्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्हाधिकार्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे अधिकार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कारण जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांबरोबर बैठका घेतल्या आहेत. अनेक संघटनांनी त्यांना निवेदनेही दिली आहेत. त्यामुळे इतरांनाही लागण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.