बेळगाव : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे बैंलहोंगल तालुक्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लाम्मा देवीचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 15 जून पर्यंत बंदच राहील, अशी माहिती सौंदत्ती रेणुका देवी मंदिर कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी श्री रेणुका देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असताना, अद्यापही काही भाविक सौंदत्ती येथे दर्शनासाठी येत आहेत. जनतेचे आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा प्रशासनाने 15 जून पर्यंत श्री रेणुका देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोटरागस्ती यांनी दिली आहे. मंदिरात धार्मिक विधी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरु आहेत असे ही स्पष्ट केले आहे.