कर्नाटक-शिवमोग्गा : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असतात. आता साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. कर्नाटकातील शिवमोग्गा इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आणि धर्मप्रचारक यांच्या विरोधात बोलताना त्या म्हणाल्या, हिंदूंना त्यांच्यावर आणि प्रतिष्ठेवर हल्ले करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. जेव्हा जिहाद पसरवणारे लोक शस्त्र उचलू शकतात, तेव्हा हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं ठेवू शकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केलाय.
'अत्याचारी आणि पापींचा अंत करा''हिंदू जागरण वेदिका'च्या वार्षिक कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर पुढं म्हणाल्या, 'लव्ह जिहाद' ही त्यांची परंपरा आहे. एखाद्याचं प्रेम असलं तरी त्यातही जिहाद करतात. आम्ही (हिंदू) देखील प्रेम करतो. आम्ही देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतात. देवानं निर्माण केलेल्या जगात सर्व अत्याचारी आणि पापींचा अंत करा, अन्यथा इथं प्रेमाची खरी व्याख्या टिकणार नाहीये. म्हणूनच, लव्ह जिहादमध्ये सामील असलेल्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या. तुमच्या मुलींचं रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा, असं आवाहनही त्यांनी केलं.
'स्वसंरक्षणासाठी शस्त्रं हाती घ्या'शिवमोग्गातील हर्षसह हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनांकडं लक्ष वेधून प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरात ठेवावा. आपल्या घरात शस्त्रं ठेवावीत. हिंदूंनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुऱ्या तरी धारदार ठेवाच, असा सल्ला त्यांनी दिला. कोणती परिस्थिती कधी निर्माण होईल हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळं जर कोणी आमच्या घरात घुसून आमच्यावर हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणं हा आमचा हक्क आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.