कवठेएकंद (जि. सांगली) : अवघ्या 10 दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली असतानाही तो गणेश विसर्जन मिरवणुकीला गेला... पण... डीजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली. शेखर सुखदेव पावशे (वय 32) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसरी घटना जिल्ह्यातच दुधारी (ता. वाळवा) येथे घडली. तिथेही आवाजाच्या दणदणाटाने 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला. संपूर्ण गावात डीजेचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात येताच भोवळ येऊन ताे खाली पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने त्याला तासगावला खासगी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता. शेखरचा जीव वाचला असता, अशी चर्चा आता येथे सुरू आहे. शेखर याचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात युवा उद्योजक म्हणून त्याने नावलौकिक मिळवला होता. काही वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याला चार वर्षाची लहान मुलगीही आहे. मात्र अँजीओप्लास्टी झाली असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी समोर जाणे त्याच्या जीवावर बेतले.
वाळव्यातही एका तरुणाचा मृत्यूबोरगाव : दुधारी (ता. वाळवा) येथे प्रवीण यशवंत शिरतोडे (35) याचा मृत्यू झाला. शिरताेडे याचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. साेमवारी सायंकाळी कामावरून घरी पोहोचला. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत गेला. काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने त्याला अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसाेबत नाचत असतानाच चक्कर येऊन खाली पडला. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात नेले परंतु डाॅक्टरांनी मृत घोषित केले.