80 पेक्षा जास्त एसटी बस फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद

80 पेक्षा जास्त एसटी बस फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

बीडमध्ये 70 बस फोडल्या;
मराठा आंदोलनाचा भडका;
कल्याण कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणार्‍या बस बंद;

पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द
महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या (ST Bus) फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 160  बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत. 
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (Kalyana Karnataka Road Transport Corporation (KKRTC)) ची महाराष्ट्र राज्यातील उमरगा (धाराशीव) येथे आंदोलकांनी (कर्नाटकाची) एक बस पेटवून दिल्याने महाराष्ट्रातील बससेवा निलंबित करण्यात आली आहे. कर्नाटकाच्या सीमेवरील बीदरमधील भालकी येथून पुण्याकडे जाणारी KA-38 F-1201 क्रमांकाची बस महाराष्ट्रातील उमरगाजवळील तारुरी गावात आंदोलकांनी अडवली. 39 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि बस पेटवून देण्यात आली. बसमधील वाहक आणि चालक जमावाला विनंत्या करीत होते, तरीपण कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही असे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले. गावाजवळ बस थांबली असता संतप्त जमावांनी बस पेटवून दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस निरीक्षक डी. बी. पालेकर, उमरगा आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. उमरगा नगर पालिकेच्या अग्निशमन गाडीने आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र अग्निशमनगाडी येण्याच्या आधी संपूर्ण बसगाडीने पेट घेतला होता.
महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
  गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद  आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे.  तसेच  बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर  जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद आहे.   गेल्या चार दिवसांत राज्यभरात 80 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड  तर दोन एसटी बसेसची जाळपोळ  एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच  कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द
बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारातून 70 पेक्षा जास्त बस फेऱ्या या मराठवाड्यात होत असतात. मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.
बीडमध्ये 70 बस फोडल्या 
 आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बीडमध्ये बस स्थानकामध्ये पोहोचला.  यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या  होत्या.  जमावाने या सगळ्या  बस फोडल्या आहेत..

Maratha quota protests : ST buses from Pune suspended on Jalna Beed and Marathwada routes

Maratha Reservation Stir : Karnataka Suspends Bus Services To Maharashtra After Bus Torched In Omerga

Karnataka Suspends Bus Services To Maharashtra

Karnataka Bus Fire In Maharashtra

80 पेक्षा जास्त एसटी बस फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद
बीडमध्ये 70 बस फोडल्या; मराठा आंदोलनाचा भडका; कल्याण कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणार्‍या बस बंद;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm