बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील मलप्रभा नदीवरील कुसमळीनजीकचा ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या ठिकाणी आता नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावर कुसमळी गावानजीक मलप्रभा नदीवर ब्रिटिश आमदानीमध्ये दळणवळणासाठी 125 वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम केले होते.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
दर्जेदार ब्रिटिश बांधकामशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला हा पूल काही भागाचा अपवाद वगळता आजही सुस्थितीत होता. नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी पुलाला एकूण 6 दगडी कमानी होत्या. या पुलाच्या वैशिष्ट्यापूर्ण बांधकामामुळे नदीतील पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत असल्याने या पुलावर क्वचितप्रसंगी पाणी येत असल्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी बेळगाव, जांबोटी, कणकुंबी हा मार्ग गोव्यापर्यंत जोडण्यात आल्यामुळे व या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा दिल्याने या रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले. तसेच या रस्त्याने बेळगाव-गोवा हे अंतर 40 किलोमीटरने कमी होत असल्यामुळे इंधन व वेळेची बचत करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला.
सुरुवातीला या रस्त्यावरून हलकी माल वाहतूक व प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र नंतर या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू झाल्याने या पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक सुरू झाल्यामुळे हा पूल दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक बनू लागला. तसेच या पुलावर अनेक ठिकाणी भगदाड पडल्यामुळे हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला होता. 2007 साली या पुलाची आयुमर्यादा संपली असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करून या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी, असे लेखी पत्र ब्रिटिश सरकारच्यावतीने भारत सरकारला पाठविण्यात आल्यामुळे या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच काही वर्षांपूर्वी पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने सरकारला पाठविण्यात आल्यामुळे या पुलावरून होणारी अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, तसेच या पुलाच्या जागेवर नवीन पुलाचे बांधकाम करावे यासाठी जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांनी आंदोलन करून लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. या सर्वांची दखल घेऊन जुलै 2024 मध्ये बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या धोकादायक पुलाची पाहणी करून प्रवासी व अवजड वाहतुकीसाठी पूल बंद करण्याचा आदेश दिला होता.
याची दखल घेऊन राज्य शासनाने बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गाचे डांबरीकरण तसेच मलप्रभा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत निधी मंजूर करण्यात आला होता. या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच मलप्रभा नदीवर नवीन पुलाचेदेखील बांधकाम करण्यात येणार असल्यामुळे भविष्यकाळात बेळगाव-गोवा वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी समस्या मार्गी लागणार आहे. या पुलाचे अस्तित्व तसेच राखून या ठिकाणाहून नवीन पूल बांधावा अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली होती. मात्र वन खात्याच्या अडथळ्यामुळे सदर पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.
वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग : या धोकादायक पूल पाडण्याच्या कामाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला असला तरी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराने नदी पात्रातून पर्यायी रस्त्याची निर्मिती केली असल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. तसेच रस्त्याचे डांबरीकरण व पुलाच्या बांधकामाचे काम हाती घेतल्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून महिन्याच्या अगोदर पूर्ण करायचे असल्यामुळे कंत्राटदाराने हे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
नव्याने पूल उभे करण्यासाठी कामही सुरू होणारगेल्या 8-10 वर्षांपूर्वी हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे या पुलावरून वाहतूक धोकादायक बनली होती. यासाठी सरकार दरबारी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी आम्ही कणकुंबी भागातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मागील वर्षी सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीस बंदी घातली. आणि त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी मंजूर केल्याने या पुलाचे काम सुरू झाले आहे. हा ब्रिटिशकालीन पूल गोवा आणि बेळगावशी भावनिक नाते जोडणारा होता. या पुलावरून गोवा आणि बेळगावचे नातेसंबध दृढ झाले होते. हा ऐतिहासिक पूल आता नामशेष झाला आहे.
