बेळगाव—belgavkar—belgaum : बाजारपेठेतील बेशिस्त फेरीवाले आणि व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. ग्राहकांना ये-जा करण्यासाठी दुकानांसमोर लावण्यात आलेले लोखंडी पाईप्स, त्याचबरोबर दुकानांबाहेर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. सोमवारी गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, तर मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानक ते खडेबाजार रोडवर एसीपी जोतिबा निकम यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करून देण्यात आला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून जोतिबा निकम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर आणि बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासह व्यापाऱ्यांनाही शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यबाजारपेठेत व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने अतिक्रमण करत व्यवसाय थाटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी दक्षिण रहदारी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्लीतील फेरीवाले, बैठे व्यापारी, व्यापाऱ्यांना विविध सूचना केल्या. रस्त्यावर थांबून व्यापार न करता रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करावेत, त्याचबरोबर ग्राहकांना ये-जा करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर लावलेले लोखंडी पाईपदेखील पोलिसांनी जप्त केले.
त्यानंतर मंगळवारी उत्तर रहदारी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानक ते खडेबाजार रोडवरील व्यापाऱ्यांना पोलिसांनी सूचना केल्या. त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर लोखंडी पाईप टाकून तीन ते चार फूट रस्ता अडविला होता, ते साहित्य पोलिसांनी जप्त करत वाहने पार्क करण्यासाठी रस्ता खुला करून दिला. दुकानांबाहेर अतिक्रमण करून लावलेले साहित्यही हटविण्यास पोलिसांनी सांगितले.
