बेळगाव—belgavkar : शमनेवाडी-बेडकीहाळ मार्गावर दोन मोटारसायकलींची धडक होऊन शमनेवाडी येथील युवक ठार झाल्याची घटना घडली. शशिकांत जिन्नाप्पा खोत (पट्टणकुडे, वय 46) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
शमनेवाडी येथील शेतकरी शशिकांत खोत हा मोटार सायकलवरून शमनेवाडीहून बेडकिहाळकडे जात होता. याच दरम्यान सदलगा येथील युवक मोटारसायकलवरून बेडकिहाळकडे जाताना शशिकांतला मागून जोराची धडक दिल्याने दोघे मोटारसायकलस्वार गाडीवरून खाली पडले. याच दरम्यान शशिकांतचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातस्थळी ग्रामस्थांनी धाव घेत शशिकांत खोत याला जवळच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी हालविले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत शशिकांत खोत यांच्या मागे आई, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे.