बेळगाव—belgavkar : बेळगावहून राजगोळी (ता. चंदगड, कोल्हापूर) येथील हेमरस साखर कारखान्याला ऊस भरून जाणारा ट्रॅक्टर गुरुवारी रात्री जाळण्यात आला. या घटनेत ट्रॅक्टरचे इंजीन पूर्णपणे जळाले आहे. बोडकेनहट्टीनजीक गुरुवारी रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचे इंजीन पूर्णपणे जळून खाक झाल्याने वाहन मालकाला मोठा फटका बसला आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन हाती घेतले आहे. विविध ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे हे कृत्य शेतकरी संघटनेने केले आहे की समाजकंटकांनी? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोडणी सुरू झाली आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर धावू लागले आहेत. मात्र, शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे.
मागीलवर्षीचे उसाचे 400 रु. व चालू वर्षीच्या गळीत हंगामाला साडेतीन हजारची पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, निर्णय जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे. मात्र, गळीत हंगामाला प्रारंभ झाल्याने ऊसतोडणीसह वाहतूकही सुरू आहे. मात्र, बोडकेनहट्टीनजीक वाहतूक करणाऱ्या ऊस ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे.