बेळगाव—belgavkar—belgaum : वारसा हक्काने सुनेला मिळणारी जमीन तिला मिळू न देता 23 वर्षांपूर्वी मृत झालेल्या सासूच्या जागी भलत्याच महिलेला सासू भासवून तब्बल ₹ साडेसहा कोटींची शेतजमीन परस्पर विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाची शिवारातील साडेआठ एकर शेतजमिनीच्या या गोलमालप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
बिनिता विजय आजगावकर (रा. मुंबई) असे फसवणूक झालेल्या सुनेचे नाव आहे. तिची सासू कमलाबाई यशवंत प्रभुआजगावकर यांचा मृत्यू 2001 मध्ये झाला होता, तर विनिताचे पती विजय यशवंत प्रभूआजगावकर यांचा मृत्यू 2003 मध्ये झाला. मृत्यूपूर्वी कमलाबाईंनी आपल्या नावावरची मालमत्ता विजय यांच्या नावे केली होती; तसे मृत्यूपत्र केले होते. त्यानंतर विजय यांचाही मृत्यू झाल्यानंतर वारसा हक्काने ती जमीन विनिता यांच्या नावे व्हावयास हवी होती, पण, तसे होण्याआधीच मृत कमलाबाईला जिवंत दाखवून भलत्याच महिलेला नोंदणी अधिकाऱ्यांसमोर उभेकरून हा विक्री व्यवहार करण्यात आला आहे.
या प्रकरणी सागर दत्तात्रय जाधव (रा. कंग्राळी बोके), सुरेश यल्लाप्पा बेळगावी (रा. मुत्यानहट्टी), शांता मोहन नार्वेकर (सावकार गल्ली, कडोली) व हारुणरशीद अब्दुलमजीद तहशीलदार (रा. कल्मेश्वर गल्ली, कडोली) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
आधी हे प्रकरण वडगाव ग्रामीण पोलिसांत नोंद होते. त्यावेळी त्यांनी सुरेश बेळगावीला अटक केली होती. आता हे प्रकरण शहर सीईएनकडे वर्ग झाले आहे. त्यानंतर सीईएनचे उपअधीक्षक जे. रघू यांनी उर्वरित तिघांना अटक केली. वडगाव व तसेच सीईएन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाची येथे सर्व्हे नंबर 59, 60,62/1 येथे कमलाबाई यशवंत प्रभुआजगावकर यांच्या नावे 8 एकर 21 गुंठे शेतजमीन आहे. त्यांना 12 मुले असून या शेतजमिनीचे मृत्यूपत्र विजय प्रभुआजगावकर यांच्या नावे बनबले होते. त्यांचा 27 जुलै 2003 रोजी मध्ये मृत्यू झाला. त्याआधी 22 जुलै 2001 रोजी त्यांची आई कमलाबाई यांचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी कमलाबाई यांनी ही शेतजमीन विजय यांच्या नावे मृत्युपत्राद्वारे दिली होती. दोघांच्या मृत्यूनंतर ही शेतजमीन विनिता विजय प्रभुआजगावकर यांच्या नावे होणे गरजेचे होते. परंतु, संशयितांपैकी सागर जाधव याने खोटी कागदपत्रे तयार करून शांता नार्वेकर या महिलेला कमलाबाई म्हणून दाखवत त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रे तयार केली. यानंतर ही शेतजमीन परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे आपल्या नावे करून घेत ती विकली. या शेतजमिनीची सद्यः स्थितीतील किंमत साडेसहा कोटी रुपये होते. सीईएनने तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्याचे उपअधीक्षक जे. रघू यांनी सांगितले.
