बेळगाव : तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही

बेळगाव : तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही

belgavkar.com | belgaum | belgavkar

मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

संभाजी उद्यान येथे जाहीर सभा;
मराठा समाजामुळे मोदींच्या महाराष्ट्रात अधिक सभा;

बेळगाव : पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागू नये, यासाठी एकजुटीने सीमाप्रश्नासाठी मैदानात उतरा, मात्र विजय झाल्याशिवाय माघारी फिरू नका. मराठा आरक्षणाप्रमाणेच सीमा प्रश्नासाठी आरपारची लढाई सुरू करू या. महाराष्ट्र पाठीशी राहिला, तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.
महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान येथे जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे-पाटील यांनी एकदा शब्द दिला, की समोर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असले तरी माघारी हटत नाही. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाला पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही संघर्ष करत आहात. मात्र, येणाऱ्या काळात एकदा रस्त्यावर आला तर मागे फिरायचे नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरत असताना मरण डोळ्यासमोर ठेवून आंदोलनात उतरलो.
गेल्या 79 वर्षांपासून संघर्ष करूनदेखील समाजाला आरक्षण दिले जात नव्हते. मराठा समाजावर अन्याय करण्याची कारणे शोधत होतो. त्यानंतर आरक्षणाच्या मुळाशी जाऊन आंदोलनाला सुरुवात केली आणि सहा कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला. अद्याप संघर्ष संपलेला नाही, येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांत मराठा उमेदवार उतरले जातील. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत मराठा उमेदवार फक्त मराठा समाजाच्या मतांवर निवडून येऊ शकतात. मराठा समाजाच्या प्रश्नाप्रमाणेच बेळगावचा प्रश्न देखील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, असे सांगितले जाते. त्यामुळे या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून लढा उभारण्यासाठी एक परिषद घ्यावी लागेल. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही, असे म्हणत होते. मात्र, सहा कोटी गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू ठेवला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचे 95 टक्के काम झाले आहे.
मराठा कुणबी कायदा होणे बाकी आहे, मात्र तो कायदा देखील लवकर करावा, यासाठी पुन्हा लढा हाती घेतला जाईल, असे सांगून ते म्हणाले, एकाच वेळी अनेक प्रश्न हाती न घेता एक एक प्रश्न हाती घेऊन, प्रश्न सोडवू या. समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा करून या प्रश्नावर काय करता येईल, याबाबत परिषद घेऊया आणि लढायला सुरुवात करूया. मात्र, एकदा लढा सुरू केल्यानंतर मागे फिरायचे नाही. सर्वांनी आपली एकजूट कायम ठेवणे गरजेचे असून संघटितपणे लढा दिला तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
जरांगे पुढे म्हणाले, मराठा समाजामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात अधिक सभा घ्यावा लागत आहेत, ही मराठ्यांची ताकद असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घ्याव्या लागत आहेत, असा टोलाही त्यांनी सभेवेळी लगावला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी स्वागत, गुणवंत पाटील, रमाकांत कोंडुस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले.

Manoj Jarange Patil Belgaum Maratha

Manoj Jarange Patil

बेळगाव : तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm