देशातून गुपचूप पळून जाण्यासाठी नातवाला मदत केली. मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप. Prajwal Revanna ‘sex scandal’

देशातून गुपचूप पळून जाण्यासाठी नातवाला मदत केली. मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप. Prajwal Revanna ‘sex scandal’

belgavkar.com | belgaum | belgavkar

Karnataka Sex Scandal;
देवेगौडा यांनी अतिशय विचारपूर्वक ‘प्लॅन’ बनवला

कर्नाटक : देश हादरवून टाकणारे हासन जिल्ह्यातील महिला लैंगिक छळ प्रकरण आणि अश्‍लील व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या खासदार प्रज्वल रेवण्णा यांना देशातून गुपचूप पळून जाण्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी ‘प्लॅन’ बनवला, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘हासन लोकसभा (Hassan Lok Sabha) मतदारसंघातील भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे संयुक्त उमेदवार आणि विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी 26 एप्रिलला मतदान केले. त्यानंतर प्रज्वल गायब झाले. त्याचदिवशी किंवा 27 एप्रिलला पहाटे त्यांनी देश सोडला. ते ताबडतोब रवाना झाले. ते जर्मनीतील फ्रॅंकफर्ट येथे गेल्याचा अंदाज आहे. तेथून युरोपात किंवा अमेरिकेतही गेले असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जगात ते कोठेही लपून बसले असतील.
नातू प्रज्वल यांना पळून जाण्यासाठी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी अतिशय विचारपूर्वक ‘प्लॅन’ बनवला आणि तो तडीस गेला. पण, प्रज्वल यांना पासपोर्ट आणि व्हिसा कोणी दिला? त्याच्या मागे केंद्र सरकार आहे. प्रज्वल पळून जाणार, याची केंद्राला निश्‍चित माहिती होती. केंद्राच्या मदतीने देवेगौडांनी प्रज्वलला पळून जाण्यात मदत केली. उलट केंद्र सरकार कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर आरोप करीत आहे, की आम्ही प्रज्वलला मदत केली.’’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, शहा बिनबुडाचे आरोप करत आहेत. प्रज्वलने केलेल्या कारनाम्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना होती. हे माहीत असतानाही उमेदवार म्हणून हासन लोकसभा मतदारसंघातून प्रज्वल रेवण्णा यांना का उमेदवारी दिली, ते त्यांनी स्पष्ट करावे. ‘मातृशक्ती’चा डांगोरा पिटणाऱ्या मोदी-शहा यांना हे माहीत असूनही प्रज्वलला रिंगणात उतरविले कसे? एवढेच नव्हे, तर भाजप धजदशी युती करण्याअगोदर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असावेत.
उलट धजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी हे ‘आमचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा यात हात असल्याचा निराधार आरोप करत आहेत. कुमारस्वामी म्हणतात की, पेन ड्राईव्ह आणि व्हिडिओ हे भाजपचे नेते देवराजेगौडा यांना दिले होते; तर मग शिवकुमार यांच्याकडे कसे दिले? उलट देवराजेगौडा यांनी हे कबूल केले आहे की, पेन ड्राईव्ह आणि व्हिडिओ त्यांना मिळाले आहेत. त्यांनी शिवकुमार यांना दिल्याचे सांगितले नाही. या एकूणच प्रकरणाची चौकशी आणि तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे.
अतिरिक्त पोलिस महासंचालक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा अहवाल काय येतो, ते पाहिले पाहिजे. या प्रकरणाचा तपास अतिशय पारदर्शकपणे केला जाईल. त्यात कोणाचाही हस्तक्षेप असणार नाही. काँग्रेस सरकारचा त्यात हस्तक्षेप करण्याचा संबंध येत नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.

Prajwal Revanna Obscene Video Case

Prajwal Revanna ‘sex scandal’

देशातून गुपचूप पळून जाण्यासाठी नातवाला मदत केली. मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप. Prajwal Revanna ‘sex scandal’
Karnataka Sex Scandal; देवेगौडा यांनी अतिशय विचारपूर्वक ‘प्लॅन’ बनवला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm