“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, महिलेने वाचला अत्याचाराचा पाढा @कर्नाटक

“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, महिलेने वाचला अत्याचाराचा पाढा @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

जेडीएसचा नेता प्रज्ज्वल रेवण्णा

कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने धाडस दाखवत प्रज्ज्वलच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर करून तिच्यावर 3 वर्ष वारंवार लैंगिक अत्याचार केले, असा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष तपास पथकासमोर (SIT) पीडित महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडे एफआयआर नोंदविण्यात आला.
एफआयआरमधील माहितीनुसार, पीडित महिला जनतेची कामं घेऊन आणि विकासासाठी निधी मिळावा म्हणून आमदार आणि खासदारांच्या कार्यालयात जात असे. एका विद्यार्थीनीला वसतिगृहात प्रवेश मिळावा या कामासाठी ती प्रज्ज्वल रेवण्णाच्या कार्यालयात गेली होती. तेव्हा प्रज्ज्वलने तिच्यावर बळजबरी केली, हे सांगताना पीडिता म्हणाली, “2021 साली मी प्रज्ज्वलच्या कार्यालयात गेली असताना त्याने मला पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले. जिथे इतर महिलाही बसल्या होत्या. तळमजल्यावरील इतरांची कामे संपवून प्रज्ज्वल वर आला. तिथे त्याने इतर महिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना पाठवून दिले. शेवटी मी एकटीच उरले होते. तेव्हा त्याने मला एका खोलीत जायला सांगितले.”
“सदर खोलीत गेल्यानंतर प्रज्ज्वलने मला ढकलून दिले आणि दरवाजा आतून बंद केला. दरवाजा बंद का केला? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने मला बेडवर बसायला सांगितले. माझा पती खूप बोलतो. त्याच्यामुळे माझ्या सासूचे आमदारकीचे तिकीट कापले गेले. जर मला राजकीयदृष्ट्या पुढे जायचे असेल तर मी सांगतो, तसे कर”, अशा शब्दात प्रज्ज्वलने धमकावल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले.
त्यानंतर प्रज्ज्वलने मला कपडे उतरविण्यास सांगितले. मी नकार दिला आणि मदतीसाठी याचना केली. पण प्रज्ज्वल मला धमकावतच राहिला. तो म्हणाला, त्याच्याकडे बंदूक आहे आणि तो मला आणि माझ्या पतीला सोडणार नाही. त्यानंतर त्याने मोबाइल काढून माझे चित्रीकरण सुरू केले, असा आरोप पीडित महिलेने केला. 1 जानेवारी 2021 ते 25 एप्रिल 2024 या तीन वर्षांच्या काळात व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकवेळा प्रज्ज्वलने आपल्यावर अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आजवर भीतीच्या सावटाखाली असल्यामुळे मी तक्रार करण्यास पुढे आले नाही. पण आता प्रज्ज्वलच्या विरोधात एसआयटी स्थापन केल्यामुळे मी तक्रार करण्याचे धाडस करत आहे, अशी माहिती पीडितेने दिली.

Prajwal Revanna sexual assault case raped and blackmailed

Prajwal Revanna woman alleges he raped and blackmailed her

“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, महिलेने वाचला अत्याचाराचा पाढा @कर्नाटक
जेडीएसचा नेता प्रज्ज्वल रेवण्णा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm