जातीय हिंसाचारामुळे प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?

जातीय हिंसाचारामुळे प्रतिष्ठा पणाला;
कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघ

Gulbarga Constituency of Karnataka Lok Sabha Election 2024

कर्नाटकातील गुलबर्गा (कलबुर्गी) लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांत जातीय हिंसाचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. 2019 मध्ये भाजपाकडून पराभूत झालेल्या जागा परत मिळवण्याची रणनीती मल्लिकार्जुन खरगे यांनी आखली आहे. परंतु, या घटनांमुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडणूक रणनीतीला फटका बसण्याची शक्यता आहे. 2009 आणि 2014 मध्ये खरगे यांनी जिंकलेल्या अनुसूचित जाती-राखीव मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी दिली आहे. ते खरगे यांचे मेहुणे (त्यांच्या पत्नीचे भाऊ) आणि जावई (त्यांच्या मुलीचे पती) आहेत. दोड्डामणी पूर्वी खरगे यांच्या पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघाचे व्यवस्थापन करायचे.
30 एप्रिल रोजी कलबुर्गी जिल्ह्यातील (आधी गुलबर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी लिंगायत समाजाच्या सदस्याच्या घरावर दलित तरुणांच्या एका गटाने हल्ला केल्याचा आरोप होता. दुसऱ्या दिवशी आरोपी असलेल्या मागास जातीतील तरुणाच्या आत्महत्येच्या बातम्या आल्या. या दोन्ही घटनांपूर्वी दोड्डामणी या परिसरात प्रचार करताना दिसले. 24 एप्रिल रोजी खरगे यांनी मतदारांना केलेले भावनिक आवाहनही ते घराघरात पोहोचवत होते.
काँग्रेसचे स्थानिक नेते सी. बी. पाटील हे मान्य करतात, “गुलबर्गा येथील निवडणुका राष्ट्रीय घटक किंवा जाहीरनाम्यांवरून ठरत नाहीत. भावनिक मुद्द्यांवर त्यांचा कल असतो. दोन घटना (30 एप्रिल, 1 मे) इथल्या निवडणुकीचा निकाल ठरवतील.” 3 मे रोजी काँग्रेसने लिंगायतांच्या भावना शांत करण्यासाठी बैठक घेतली. त्यावर बोलताना भीमशंकर पाटील यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “नक्कीच नुकसान झाले आहे. काँग्रेसला मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा पाठिंबा होता. पण रातोरात परिस्थिती बदलली आहे.” पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप असलेल्या लिंगायत सदस्याच्या घरावर 30 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याबद्दल पाटील म्हणाले, “महिलांनाही मारहाण करण्यात आली. जवळपास 60 टक्के लोक काँग्रेसच्या बाजूने होते, पण आता परिस्थिती उलट आहे. समाज संतप्त आहे.”
स्थानिक मतदारांच्या भावना काय? : काँग्रेसच्या आत्मविश्वासाचे आणखी एक कारण म्हणजे भाजपाचे विद्यमान खासदार उमेश जाधव यांनी या प्रदेशासाठी फारसे काही केले नाही. मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल असंतोषाची भावना होती. “जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात एकाही प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी रिबनही कापलेली नाही. ते कुठेच दिसले नाही. ते केवळ मोदींमुळे त्या जागेवर आहेत. खरगे यांनी दलितांना सशक्त केले आहे,” असे स्थानिक शेतकरी नागाप्पा येरगोळ म्हणतात.

कलबुर्गी शहरातील एक वयोवृद्ध दुकानदार मयूर बी म्हणतात की, जाधव यांनी काहीही केले नाही. परंतु, ते असेही सांगतात, काहींना असे वाटते की, 7 मे रोजी होणारे मतदान वरच्या व्यक्तीला म्हणजेच मोदींना असावे.” ग्रामीण गुलबर्गा येथील एक कार चालक सोहेल अहमद म्हणतात, लिंगायतांचा काँग्रेस उमेदवाराला विरोध आहे. मुस्लिम काँग्रेससाठी एकत्र येत आहेत. तर गुरुमितकल येथील दलित चालक म्हणतात, आम्ही खरगे यांच्या बाजूने आहोत. आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही.

जातीय समीकरण : जाधव यांना तिकीट दिल्यामुळे लिंगायतांसह भाजपादेखील काही प्रमाणात अनुसूचित जातीतील व्होट बँकेवर अवलंबून आहे. गुलबर्गामधील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 35 टक्के दलित आहेत, तर 30 टक्के लिंगायत आहेत. लिंगायत ही भाजपाची व्होट बँक आहे. या मतदारसंघात काँग्रेस खरगे यांच्या दलित समुदायासह मुस्लिम (लोकसंख्येच्या 20 टक्के) आणि ओबीसींच्या एका गटावर अवलंबून आहे.

दलितांमधील राजकीय शक्तीचा उदय अनेक लिंगायतांना मान्य नाही. “अनेक लिंगायतांना खरगेंच्या राजकीय वर्चस्वामुळे धोका वाटत आहे,” असे लिंगायत नेते म्हणतात. अलीकडील घटनांमुळे त्यांची भीती अधिक दृढ झाल्याचेही ते सांगतात. कलबुर्गीतील इतर दलित गटांनाही असे वाटते की, अनुसूचीत जाती/ जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा खरगेंमुळे एक शस्त्र ठरत आहे. कलबुर्गी लिंगायत नेते सांगतात की, प्रदेशात मोठ्या प्रमाणात ॲट्रॉसिटी केसेस दाखल केल्या जात आहेत.
“काँग्रेस आघाडीचा विजय झाल्यास खरगे पंतप्रधान होतील” : 3 मे रोजी झालेल्या वीरशैव लिंगायत अधिवेशनात काँग्रेसच्या लिंगायत नेत्यांनी खरगे यांच्याकडे पाठ फिरवू नका, असे आवाहन केले होते. काँग्रेस आघाडीचा विजय झाल्यास खरगे पंतप्रधान होऊ शकतात, असे काँग्रेस नेते मतदारांना सांगत आहेत. सभेला संबोधित करणारे गुलबर्गा दक्षिण काँग्रेसचे आमदार अल्लमप्रभू पाटील म्हणाले की, भाजपाच लिंगायतविरोधी आहे. “संघाचा आमच्यावर विश्वास नाही. शक्य असतांनाही त्यांनी आरक्षण दिले नाही. ईएसआय रुग्णालयापासून विमानतळापर्यंत खरगे यांनी या प्रदेशात खूप विकास केला आहे. खरगे यांचे जवळचे सहकारी आणि कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी खरगे पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने लिंगायत सदस्याच्या घरावरील हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे.
खरगेंचे मतदारांना भावनिक आवाहन : दोड्डामणी यांच्यासाठी मते मागताना खरगे स्वतः आपल्या कामांविषयी सातत्याने बोलताना दिसत आहेत. 24 एप्रिल रोजी त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, “गुलबर्गा आणि कर्नाटकात केलेले काम पहा. जेणेकरून मी मरेन तेव्हा तुमच्यापैकी काहीजण माझ्या अंतिम संस्कारासाठी येतील. तुम्ही मला मत दिले नाही तरी लोक माझ्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी बघतील आणि म्हणतील मी खूप चांगले काम केले.” खरगे पुढे म्हणाले की, राजकारण करण्यासाठी आणि भाजपा व संघाच्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे.

काँग्रेसचे स्थानिक नेते अबरार सैत यांनी हे मानी केले की, दोड्डामणी यांना तिकीट देणे टाळता आले असते. “श्री खरगे यांनी स्वतः निवडणूक लढवायला हवी होती किंवा त्यांच्या कुटुंबाबाहेरील कोणाला तरी उमेदवारी द्यायला हवी होती. खरगे हे तत्त्वनिष्ठ मानले जातात. पण राधाकृष्ण यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाने चुकीचे संकेत दिले आहेत.” गुलबर्गा येथील खासदार बदलण्यासाठी लोक तयार झाले होते, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

Kalaburagi Lok Sabha Seat : With No Kharge This Time Can BJP MP Jadhav Surmount Anti incumbency Challenge?

जातीय हिंसाचारामुळे प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?
कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm