बेळगाव—belgavkar—belgaum : क्वॉरीच्या कार्यालयात ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाल्याने हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) परिसरात मंगळवारी दुपारी खळबळ उडाली. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, हा स्फोट एका दर्ग्याजवळ झाल्याने थोडाफार गोंधळ उडाला होता.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हिरेबागेवाडीजवळ असलेल्या उदय शशीकुमार यांच्या क्वॉरीत दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणार्या जिलेटिन कांड्यांचा साठा केलेला होता. केके कोप्प गावातील एका टेकडीला काही समाजकंटकांनी आग लावली. ती आग पसरुन क्वॉरीच्या कार्यालयापर्यंत पोचली.
आगीच्या संपर्कात येताच जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरुन गेला. नेमके काय झाले हेच सर्वांना समजेनासे झाले. हिरेबागेवाडी पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता वस्तुस्थिती उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
