बेळगाव : निपाणी : सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे निपाणी शहर व परिसरात सुमारे 30 विद्युत खांब मोडून उन्मळुन पडले. तर लहान-मोठी शेकडो झाडे मुख्य रस्त्यासह संपर्क रस्त्यावर कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये यरनाळ रोडला लागून असलेला कोंबडी फार्म उध्वस्त झाला. तर बेळगाव नाका येथील माऊली रेडियम शॉपीवर झाड कोसळल्याने दोन्ही ठिकाणचे सुमारे 10 लाखाचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी 6 पासून वीज पुरवठा खंडित झाल्याने संपुर्ण शहर रात्रभर अंधारात राहिले. शिवाय मंगळवार दिवसभरही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला तारेवरची कसरत करावी लागली.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत होते. त्यामुळे एखादा वळीवचा पाऊस पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती. सोमवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखःद धक्का मिळाला. सोमवारी सकाळपासूनच हवेत अधिक उष्मा जाणवत होता. सायंकाळी सहानंतर गारपिटासोबत वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला. दरम्यान या काळात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर कौले फुटली तसेच यरनाळ रोड येथील संदीप शेटके यांच्या मालकीचा कोंबडी फार्म वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाला. यावेळी कोंबडी फार्म वरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शिवाय 600 पक्षी गतप्राण झाल्याने सुमारे शेटके यांचे 5 लाखाचे नुकसान झाले.
तर बेळगाव नाका येथे असलेल्या अमोल माहूरकर यांच्या मालकीच्या माऊली रेडियम शॉपीवर उंबराचे झाड कोसळल्याने मशिनरी व इतर साहित्याचे सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले. याशिवाय अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तर विद्युत खांब कोसळल्याने तब्बल 24 तास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय झाली. यामध्ये एकूण 2 कोटीचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक ठिकाणचे संपर्क रस्ते परिस्थिती नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. यामध्ये अनेक ठिकाणचे संपर्क रस्ते पावसामुळे बंद झाले. शिवाय सखल भागात पाणीच पाणी साचून राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.