बेळगाव—belgavkar—belgaum : उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये सालाबादप्रमाणे होणारा मळेकरणी देवीचा सप्ताह यावर्षीही मोठ्या दिमाखात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. या उत्सवाच्या सांगता समारंभ प्रसंगी होणारा महाप्रसाद यावर्षी पहिल्यांदाच खीर-बुंदीचा गोड महाप्रसाद करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे होत्या. उपस्थितांचे स्वागत आणि येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या सप्ताहासंदर्भातील सविस्तर माहिती एन. ओ. चौगुले यांनी दिली. यावेळी बी. एस. होनगेकर, बाळासाहेब देसाई, लक्ष्मण होनगेकर, पी. एल. कदम, एल. डी. चौगुले, सुशांत तुपारे, अरुण जाधव यांनी या सप्ताहसंदर्भात आपली मते व्यक्त केली. उपस्थितांनी सदर सप्ताह मोठ्या प्रमाणात करण्यात यावा. तसेच देवीची पालखी 13 मार्च रोजी काढण्यात येते. यावेळी कलशधारी महिला, विद्यार्थी, पुरुष, महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहावा. तसेच सांगता समारंभातही या पालखी सोहळ्याला सर्वांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहून शोभायात्रा काढण्यात यावी, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीत सर्वांनी आपली मते मांडली.
सदर सप्ताह गुरुवार दि. 13 मार्च रोजी होळी पौर्णिमेला : उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाळासाहेब देसाई यांच्या वाड्यातून ही पालखी निघून मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये येऊन शुक्रवार दि. 14 मार्च धुलीवंदन, पौर्णिमेला या सप्ताहाचा शुभारंभ पहाटे महाआरतीने करण्यात येईल. या पाच दिवसांमध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रम होऊन मंगळवार दि. 18 मार्च रोजी सांगता समारंभ असून या दिवशी खीरबुंदीच्या महाप्रसाद होणार आहे. तरी गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या सप्ताह काळात उपस्थित राहून रोज होणारी महाआरती आणि सांगता समारंभदिवशी होणारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मळेकरणी देवी सप्ताह उत्सव कमिटीने कळविले आहे.
