बेळगाव—belgavkar—belgaum : बाळेकुंद्री खूर्द येथे बस वाहकावरील हल्ल्याप्रकरणी मी पोलिस प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. हा केवळ हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद असून त्याला भाषिक वादाचा रंग देऊ नये. तसेच यासंदर्भात कुणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करु नये, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ते सोमवारी काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सदर घटनेला कन्नड आणि मराठी भाषिकांमधील वाद म्हणून सादर केले जाऊ नये. अन्यथा त्याचा परिणाम बेळगाव जिल्ह्याच्या विकासावर होईल. हे एक सर्वसामान्य प्रकरण आहे. सदर घटनेमुळे कन्नड आणि मराठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी बससेवा बंद झाली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बेळगावच्या विकासावर परिणाम होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेतले आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. या पद्धतीच्या घटनांमध्ये कर्नाटकातल्या संघटना आक्रमक झाल्या की महाराष्ट्रातल्या संघटना आक्रमक होतात. महाराष्ट्रातल्या आक्रमक झाल्या की कर्नाटकातल्या होतात. खरे तर त्यांचे हे काम नाही. या पद्धतीची प्रकरणे हाताळण्यास कर्नाटक व महाराष्ट्राचे पोलिस तसेच सरकार सक्षम आहे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजू सेट, जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी आदी उपस्थित होते.
भाषेच्या वादावरून बस कंडक्टरवर अलिकडेच झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी होणारा बेळगावी चलो आंदोलन मागे घेण्याचे आवाहन जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कन्नड गटांना केले आहे.
