या पवित्र महाकुंभ मेळ्याची सुरुवात 13 जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी झाली होती. तर शेवट 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला झाला. आजच्या महाशिवरात्रीच्या अखेरच्या दिवशी पहाटे 6 वाजल्यापासून भाविकांनी पवित्र स्नानाला सुरुवात केली, दिवस संपेपर्यंत 40 लाख भाविकांनी प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमावर स्नान केलं. या महासोहळ्यात खरंतर गेल्या 45 दिवसांमध्ये एकूण 65 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला. भारतासह परदेशातूनही हिंदू भाविकांनी प्रयागराजला भेट दिली. त्यामुळं जगातील हा सर्वाधिक मोठा इव्हेंट ठरला.
महाकुंभचा असा होता कार्यक्रम ?
महाकुंभमेळ्यात गेल्या 45 दिवसांत 6 प्रमुख पवित्र स्नान पार पडले. यामध्ये तीन शाही स्नान हे मकर संक्रांती, मौनी आमावस्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी पार पडले. तर उर्वरित तीन स्नान हे पौष पौर्णिमा, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला पार पडलं.
पवित्र स्नानांचा असा होता कार्यक्रम
1. पौष पौर्णिमा (कुंभमेळ्याला सुरुवात) - सोमवार, 13 जानेवारी
2. मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान) मंगळवार, 14 जानेवारी
3. मौनी आमावस्या (दुसरं शाही स्नान) बुधवार, 29 जानेवारी
4. वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान) सोमवार, 3 फेब्रुवारी
5. माघी पौर्णिमा (प्रमुख स्नान) बुधवार, 12 फेब्रुवारी
6. महाशिवरात्री (कुंभमेळ्याचा शेवट) बुधवार, 26 फेब्रुवारी