बेळगावासह कर्नाटकाच्या चित्रदूर्ग येथील घटनेनंतर कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याच्या प्रकार कांही केल्या कमी होत नाही. शनिवारी कलबुर्गी (गुलबर्गा) शहरातील रिंग रोडला कर्नाटकातील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवुन चालक, वाहकाला काळे फासले. शिवाय बस वर काळ्या, पिवळ्या व लाल रंगाने, कन्नड भाषेत 'जय कर्नाटका' लिहित निषेध व्यक्त केला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागात असल्याने, येथे (महाराष्ट्र) मराठवाड्यातुन नांदेड, छत्रपती नगर, भोकर, जालना, निलंगा, लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासुन बस चालकांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार सुरु आहे. कर्नाटकातील संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या बसेस अडवून घोषणाबाजी करण्याचा प्रकार सुरुच आहे. यामागे महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद की, भाषा वाद आहे, याचा उलगड बसचालकांनाही होत नाही.
दरम्यान शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता नांदेड आगाराची बस कलबुर्गी बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला एका संघटनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी बस अडविली. जय कर्नाटकाच्या घोषणा करत चालक नामदेव रामराव पपुले व वाहक संदिप ग्यानोबा किरवले यांना काळे फासले. बसवर झेंडे लावले. बसच्या नंबर प्लेटवर काळे डांबर लावले, शिवाय कन्नड भाषेत 'जय कर्नाटका' लिहित निषेध व्यक्त केला.
या प्रकाराने भयभित झालेल्या चालक, वाहकाने रस्त्यात असलेल्या आळंद बसस्थानकातील चौकशी विभागाला माहिती सांगितली, परंतु त्यांनीही या प्रकाराला गांभिर्याने घेतले नाही. सायंकाळी सात वाजता चालक, वाहक यांनी उमरगा बसस्थानकात आल्यानंतर अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. या घटनेसंदर्भात चालक श्री. पपुले यांनी स्थानकप्रमुख श्री. सरवदे यांना लेखी माहिती दिली आहे.
अचानक कार्यकर्त्यांनी बस अडवुन आम्हा चालक, वाहकाला रंगविले. जोरदार घोषणाबाजी करत अंगावर येण्याचा प्रकार सुरु होता. बसवर ठिकठिकाणी कानडी भाषेत लिखान केले. बसमध्ये 54 प्रवाशी होते. झालेल्या प्रकाराने आम्ही घाबरलो होतो. हा प्रकार नेमका कोणत्या कारणाने सुरु आहे याची कल्पना नाही, मात्र चालकांची मानसिकता बिघडते.
- नामदेव पपुले, चालक नांदेड आगार
