बेळगाव—belgavkar—belgaum : संतिबस्तवाड येथील एक नर्सिंग विद्यार्थिनी गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणानंतर संतिबस्तवाडमध्ये दोन गटात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या विद्यार्थिनीच्या शोधासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
19 फेब्रुवारी रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात बेपत्ता तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे. 19 फेब्रुवारीच्या दुपारपासून ही विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. त्याच गावातील एका तरुणासोबत ती गेली असावी, असा संशय आईने व्यक्त केला आहे. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर गावात दोन गटात तणावाची स्थिती आहे.
या घटनेनंतर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एका पाठोपाठ एक एफआयआर दाखल झाले आहेत. पोलीस दलाने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध सुरु केला आहे. त्या विद्यार्थिनीच्या आईने ज्या तरुणावर संशय व्यक्त केला आहे, तोही त्याच दिवसापासून बेपत्ता आहे.
या बेपत्ता प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण लागत आहे. प्रकरण चिघळण्याआधीच विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आठवडाभरात त्या विद्यार्थिनीचा शोध घेण्यात येईल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी बोलून दाखवला आहे. गावातील एका समुदायातील धार्मिक स्थळाला धक्का पोहोचवणे, शिवीगाळ आदी प्रकरणीही एफआयआर दाखल झाले आहेत. विद्यार्थिनी बेपत्ता प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
